पिंपरी-चिंचवड हादरले: काळभोर नगरमध्ये बाळ चोरीसाठी आलेली महिला जेरबंद; बॅगेत आढळले चाकू आणि गुंगीचे औषध
पिंपरी-चिंचवड:शहरातील काळभोर नगर परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लहान मुलांची चोरी करण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या एका संशयास्पद महिलेला स्थानिक नागरिकांनी सतर्कता दाखवत पकडले आहे. या महिलेची झडती घेतली असता तिच्याकडे बाळ चोरीसाठी लागणारे साहित्य आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
बॅगेत आढळले घातक साहित्य:
नागरिकांनी या महिलेला पकडल्यानंतर तिच्या बॅगेची तपासणी केली. यावेळी तिच्याकडे एक तीक्ष्ण चाकू, गुंगीचे औषध, गुंगी आणणारा स्प्रे आणि पावडर असे साहित्य सापडले आहे. लहान मुलांना गुंगी देऊन त्यांचे अपहरण करण्याचा या महिलेचा डाव होता, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला:
काळभोर नगरमधील नागरिकांना या महिलेची हालचाल संशयास्पद वाटली. ती महिला परिसरात लपून-छपून वावरत असताना स्थानिकांनी तिला हटकले आणि विचारपूस केली. तिची उत्तरे समाधानकारक नसल्याने नागरिकांनी तिला पकडून पोलिसांच्या हवाली केले. नागरिकांनी दाखवलेल्या या प्रसंगावधानामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला आहे.
पालकांना सतर्क राहण्याचे आवाहन:
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, पिंपरी-चिंचवडमधील पालकांनी आपल्या लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. अनोळखी व्यक्ती परिसरात संशयास्पद रितीने फिरताना आढळल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा.
सध्या पोलीस या महिलेची कसून चौकशी करत असून, यामागे एखादी मोठी टोळी सक्रिय आहे का, याचा तपास सुरू आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
9822548429









