भोसरीत ‘महापौर चषक’ राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा थरार; आज सायंकाळी भव्य उद्घाटन
भोसरी | प्रतिनिधी विजय अडसूळ
माननीय मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आज भोसरी येथील गावजत्रा मैदानावर ‘महापौर चषक’ राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा भव्य उद्घाटन सोहळा होणार आहे. भोसरीच्या समृद्ध क्रीडा परंपरेला साजेशा या स्पर्धेत महाराष्ट्रभरातील विविध भागांतून आलेले नामांकित संघ आणि अनुभवी खेळाडू सहभागी होत आहेत.
स्पर्धा सायंकाळी ५:३० वाजता सुरू होईल. कबड्डीप्रेमींमध्ये या स्पर्धेबाबत प्रचंड उत्साह पहायला मिळत आहे. राज्यभरातील खेळाडूंना आपले कौशल्य आणि वेगवान खेळ प्रदर्शित करण्याची सोनेरी संधी या स्पर्धेमुळे मिळणार आहे. स्पर्धेत एकूण १६ संघांचा समावेश असून, अंतिम विजेत्याला रोख बक्षीस आणि ट्रॉफी देण्यात येणार आहे.
उद्घाटन सोहळ्यासाठी विविध मान्यवर, स्थानिक नेते आणि क्रीडा प्रेमी उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेचे निमंत्रक महापौर रविभाऊ बाबासाहेब लांडगे यांनी नागरिक, क्रीडाप्रेमी आणि कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने हजेरी लावून खेळाडूंचा उत्साह वाढवावा, असे आवाहन केले आहे. या स्पर्धेमुळे भोसरीत क्रीडा संस्कृतीला नवे बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
कबड्डीप्रेमींसाठी हा थरारक अनुभव असणार असून, स्पर्धा येत्या तीन दिवस चालेल.









