धक्कादायक: पत्नी सोडून गेल्याच्या नैराश्यातून पित्याने चिमुकलीची हत्या केली; मुलालाही मारण्याचा प्रयत्न


धक्कादायक: पत्नी सोडून गेल्याच्या नैराश्यातून पित्याने चिमुकलीची हत्या केली; मुलालाही मारण्याचा प्रयत्न

पुणे जुन्नर कौटुंबिक वाद आणि पत्नीने घर सोडून गेल्याच्या नैराश्यातून एका पित्याने आपल्या पोटच्या दोन मुलांच्या जीवावर उठल्याची हृदयद्रावक घटना पुणे-नाशिक महामार्गावरील संतवाडी परिसरात उघडकीस आली आहे. या घटनेत ३.५ वर्षांच्या चिमुकल्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, ५ वर्षांचा मुलगा सुदैवाने बचावला आहे. या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सागर सदाशिव शिंदे (वय २९, रा. मोशी, पुणे) याची पत्नी सुमारे सहा महिन्यांपूर्वी घर सोडून गेली होती. त्यानंतर सागर आपल्या दोन लहान मुलांचा सांभाळ करत होता. मात्र, पत्नीच्या विरहामुळे आणि कौटुंबिक तणावामुळे तो गेल्या काही दिवसांपासून मानसिक दडपणाखाली होता.
५ मे रोजी सकाळी, सागरने मुलगा आर्यन (वय ५) आणि मुलगी हर्षदा (वय ३.५) यांना “फिरायला घेऊन जातो” असे सांगून घरातून बाहेर नेले. रात्री उशिरा त्याने पुणे-नाशिक महामार्गालगत असलेल्या संतवाडी येथील निर्जन जंगलाचा परिसर गाठला. तिथे त्याने प्रथम आर्यनचा गळा दाबून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. आर्यन बेशुद्ध पडल्यानंतर तो मृत झाला आहे, असे समजून सागरने त्याला जंगलात फेकून दिले. त्यानंतर त्याने मुलगी हर्षदाचा गळा आवळून तिची निर्घृण हत्या केली आणि तिचा मृतदेह झुडपात लपवून तिथून पळ काढला.

बुधवारी सकाळी जंगलात आर्यन बेवारस आणि जखमी अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली. आळेफाटा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरू केली. तपासादरम्यान पोलिसांना वडील सागर शिंदे याच्यावर संशय आला. सुरुवातीला त्याने पोलिसांना चुकीची माहिती देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी खाकी वर्दीचा इंगा दाखवताच त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.

आरोपीच्या कबुलींनंतर पोलिसांनी घटनास्थळावरून चिमुकल्या हर्षदाचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या प्रकरणी आळेफाटा पोलिसांनी सागर सदाशिव शिंदे याला अटक केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असून, आरोपीवर भारतीय न्याय संहितेनुसार खून आणि खुनाचा प्रयत्न केल्याचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पत्रकार स्वप्नील लुनावत


64
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!