शाळांमध्येच भरले जाणार बालसंगोपन योजनेचे अर्ज.


शाळांमध्येच भरले जाणार बालसंगोपन योजनेचे अर्ज

टाकळीभान प्रतिनिधी — एकल माता असलेल्या विद्यार्थ्यांना महिला व बालविकास विभागाच्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी आता शाळांमध्येच अर्ज भरून घेतले जाणार आहेत.

श्रीरामपूर तालुका मिशन वात्सल्य शासकीय समितीची बैठक महसूल अधिकारी अभया राजवळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी अशासकीय सदस्य मिलिंदकुमार साळवे यांनी ही माहिती दिली.

समितीच्या सदस्य सचिव तथा प्रभारी बालविकास प्रकल्पाधिकारी शोभा शिंदे यांनी मागील बैठकीचे इतिवृत्त वाचन केले. बैठकीला अशासकीय सदस्य बाळासाहेब जपे, अर्जुन राऊत, तालुका संरक्षण अधिकारी दीपाली भिसे, श्रीरामपूर नगरपालिकेचे समुदाय संघटक हरीष पैठणे, गटशिक्षणाधिकारी कार्यालयाचे प्रतिनिधी इरफान शेख तसेच पंचायत समितीच्या उमेद विभागाचे अशोक रामकरवाल उपस्थित होते.

मात्र गटविकास अधिकारी, पोलीस, आरोग्य, तालुका विधी सेवा प्राधिकरण आणि कृषी विभागाचे अधिकारी बैठकीस गैरहजर होते. सलग तीन बैठकींपासून प्रमुख अधिकारी गैरहजर राहत असल्याने अशा अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून जाब विचारावा, अशी मागणी मिलिंदकुमार साळवे यांनी केली.

शाळांना नुकत्याच सुट्ट्या लागल्या असल्या तरी पात्र विद्यार्थ्यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेचा लाभ मिळावा यासाठी एकल माता असलेल्या विद्यार्थ्यांची स्वतंत्र नोंदवही ठेवण्याचे आदेश शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिले आहेत. त्यानुसार शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी शाळा पातळीवर पात्र विद्यार्थ्यांचे प्रस्ताव व अर्ज थेट शाळेतून भरून घेण्याचे निर्देश दिले आहेत. श्रीरामपूर तालुक्यातील शाळांनी याबाबत तातडीने कार्यवाही करावी, असे साळवे यांनी सांगितले.

शिधापत्रिकेपासून वंचित असलेल्या एकल महिलांच्या प्रश्नाकडे बाळासाहेब जपे आणि अर्जुन राऊत यांनी लक्ष वेधले. त्याची दखल घेत सभाध्यक्षा अभया राजवळ यांनी पुरवठा विभागाचे अधिकारी एस. ए. पुजारी यांना आवश्यक सूचना दिल्या.

तालुक्यात अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी केलेल्या सर्वेक्षणात ८८४ एकल महिलांच्या शिधापत्रिकेबाबत अडचणी समोर आल्याची माहिती शोभा शिंदे यांनी दिली. या महिलांची यादी गावपातळीवर देऊन त्यांच्या अडचणी सोडविण्यात येतील, असे अभया राजवळ यांनी स्पष्ट केले.

प्रतिनिधी: दिलीप लोखंडे श्रीरामपूर.


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!