हृदयद्रावक! पतीसोबतच्या वादानंतर महिलेची आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या; तळेगाव दाभाडे येथील घटना
तळेगाव दाभाडे (पुणे):
पुण्याच्या तळेगाव एमआयडीसी परिसरातील अर्बन लाईफ टॉवरमध्ये एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना घडली आहे. पतीसोबत झालेल्या वादानंतर ३५ वर्षीय प्रतिभा शंकर यांनी इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेचा थरारक व्हिडिओ समोर आला असून परिसरात खळबळ माजली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रतिभा यांचा त्यांच्या पतीसोबत कोणत्यातरी कारणावरून वाद झाला होता. या रागाच्या भरात त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. त्यांनी आठव्या मजल्यावरून उडी मारली, मात्र उडी मारल्यानंतर त्या काही वेळ बाल्कनीच्या कठड्याला लटकत राहिल्या होत्या.
मुलाचा वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्न:
विशेष म्हणजे, प्रतिभा जेव्हा बाल्कनीला लटकत होत्या, तेव्हा त्यांचा चिमुरडा मुलगा त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होता. तो आपल्या आईचा हात पकडून तिला ओढण्याचा प्रयत्न करत होता, मात्र दुर्दैवाने प्रतिभा यांचा हात निसटला आणि त्या थेट खाली कोसळल्या. प्रचंड उंचावरून पडल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.
पोलीस तपास सुरू:
या संपूर्ण घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. मुलाच्या डोळ्यादेखत आईचा असा दुर्दैवी अंत झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी पोलिसांनी घटनेची नोंद केली असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करत आहेत.
पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429








