नालेसफाई पाहणीसाठी २५ गाड्यांचा ताफा! भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्या दौऱ्यावर विरोधकांची टीका
मुंबईत पावसाळापूर्व नालेसफाईची कामे वेगाने सुरू असतानाच, मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्या एका पाहणी दौऱ्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. नालेसफाईची पाहणी करण्यासाठी साटम तब्बल २५ गाड्यांचा ताफा घेऊन पोहोचल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पंतप्रधानांच्या आवाहनाचा विसर?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच आंतरराष्ट्रीय परिस्थितीचे दाखले देत देशवासीयांना इंधन बचतीचे आवाहन केले होते. मात्र, सत्ताधारी पक्षाच्याच नेत्यांकडून अशा प्रकारे २५ गाड्यांचा लवाजमा वापरला गेल्याने “पंतप्रधानांच्या आवाहनाचा भाजप नेत्यांनाच विसर पडला की काय?” अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.
रोहित पवारांचा घणाघात
या प्रकारावरून शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. “सत्ताधाऱ्यांची अवस्था ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण’ अशी झाली आहे,” अशा शब्दांत त्यांनी साटम यांच्या दौऱ्यावर टीका केली.
पाहणी दौऱ्याच्या नावाखाली होणाऱ्या या शक्तीप्रदर्शनामुळे सर्वसामान्य जनतेमधूनही संताप व्यक्त होत असून, इंधन बचतीचे नियम फक्त सर्वसामान्यांसाठीच आहेत का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
पत्रकार उमेश कुलकर्णी 9822548429









