NEET पेपरफुटीचा नाशिक पॅटर्न; १० लाखांना घेतला आणि १५ लाखांना विकला, मुख्य सूत्रधार अटकेत
वैद्यकीय शिक्षणासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी ‘नीट’ (NEET) परीक्षेचा पेपर फुटल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या गंभीर प्रकारानंतर आता ही परीक्षा रद्द करण्यात आली असून, आगामी काळात ती पुन्हा घेतली जाणार आहे. या प्रकरणाचा तपास करत असताना प्रशासनाला आता ‘नाशिक कनेक्शन’ सापडले आहे.
१० लाखांची डील आणि १५ लाखांना विक्री
या प्रकरणातील गौप्यस्फोटांनुसार, नाशिकमधील एका आरोपीने हा पेपर १० लाख रुपयांना खरेदी केला होता आणि पुढे तो १५ लाख रुपयांना विकल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. या व्यवहारातील आर्थिक साखळी आता पोलिसांच्या रडारवर आहे.
राजस्थान पोलिसांच्या माहितीवरून नाशिकमध्ये कारवाई
राजस्थान पोलिसांनी दिलेल्या गुप्त माहितीच्या आधारे नाशिक पोलिसांनी तपास चक्रे फिरवली. या तपासात नाशिकमध्ये राहणारा ३० वर्षीय संशयित शुभम खैरनार याचे नाव निष्पन्न झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे शुभम स्वतः बीएएमएस (BAMS) चे शिक्षण घेत होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे.
या कथित पेपरफुटीमुळे हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले असून, या रॅकेटमध्ये आणखी किती जणांचा समावेश आहे, याचा शोध प्रशासन घेत आहे.
पत्रकार उमेश कुलकर्णी 9822548429









