पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रभाग समित्यांची पुनर्रचना; १० क्षेत्रीय कार्यालयांची स्थापना.

पिंपरी : नागरिकांना अधिक तत्पर, सुलभ आणि परिणामकारक सेवा देण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने मोठा निर्णय घेत विद्यमान ८ प्रभाग समित्यांची पुनर्रचना करून आता एकूण १० क्षेत्रीय कार्यालयांची स्थापना केली आहे. यासंदर्भातील आदेश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाला ऐतिहासिक किल्ल्यांची नावे देण्यात आली आहेत.
महानगरपालिकेच्या वाढत्या लोकसंख्येचा आणि विस्तारित भौगोलिक क्षेत्राचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम २९-अ नुसार लोकसंख्येच्या प्रमाणात प्रभाग समित्या स्थापन करण्याचे प्रावधान आहे. त्यानुसार १३ मार्च २०२६ रोजी झालेल्या महापालिका सभेत हा निर्णय मंजूर करण्यात आला होता.
या पुनर्रचनेनंतर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ अंतर्गत ३२ निवडणूक प्रभागांचे नव्याने विभागणीकरण करण्यात आले आहे. प्रशासनिक कामकाज अधिक गतिमान होऊन नागरिकांना त्यांच्या भागातच सेवा मिळाव्यात, हा या निर्णयामागील उद्देश असल्याचे सांगण्यात आले.
नव्याने स्थापन करण्यात आलेली क्षेत्रीय कार्यालये
अ क्षेत्रीय कार्यालय (राजगड) – संत ज्ञानेश्वर चौक, निगडी
प्रभाग क्र. १३, १४ व १५
ब क्षेत्रीय कार्यालय (सिंहगड) – लिंक रोड, एल प्रो कंपनी आवार, चिंचवडगाव
प्रभाग क्र. १७, १८ व १९
क क्षेत्रीय कार्यालय (विजयदुर्ग) – हॉकी स्टेडियम शेजारी, नेहरूनगर, भोसरी
प्रभाग क्र. २, ९ व १०
ड क्षेत्रीय कार्यालय (देवगिरी) – औंध-रावेत रोड, रहाटणी
प्रभाग क्र. २१, २७, २८ व २९
ई क्षेत्रीय कार्यालय (शिवनेरी) – पांजरपोळ संस्थेसमोर, नाशिक रोड, भोसरी
प्रभाग क्र. ३, ४ व ५
फ क्षेत्रीय कार्यालय (तोरणा) – नवनगर विकास प्राधिकरणाची जुनी इमारत, लोकमान्य टिळक चौक, निगडी
प्रभाग क्र. १, ११ व १२
ग क्षेत्रीय कार्यालय (पुरंदर) – नवीन प्रशासकीय इमारत, दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकॅडमी मागे, थेरगाव
प्रभाग क्र. २२, २३ व २४
ह क्षेत्रीय कार्यालय (प्रतापगड) – महिला आयटीआय इमारत, कासारवाडी
प्रभाग क्र. ३०, ३१ व ३२
ज क्षेत्रीय कार्यालय (रायगड) – मनपा वाहनतळ इमारत, ताथवडे
प्रभाग क्र. १६, २५ व २६
ल क्षेत्रीय कार्यालय (लोहगड) – म्हाडा प्लॉट ई-२, संत तुकाराम नगर, पिंपरी
प्रभाग क्र. ६, ७, ८ व २०
महापालिकेच्या या निर्णयामुळे प्रशासन अधिक लोकाभिमुख होणार असून नागरिकांच्या तक्रारींचे निवारण आणि सेवा वितरण अधिक वेगाने होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
प्रतिनिधी: शाम शिरसाठ पुणे.







