युरियाची साठेबाजी; टाकळीभानच्या कृषी केंद्र चालकावर गुन्हा.
श्रीरामपूर प्रतिनिधी : युरिया खताची कृत्रिम टंचाई निर्माण करून साठेबाजी केल्याप्रकरणी श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील मे. शिवशंभो कृषी सेवा केंद्राचे मालक अमोल तनपुरे यांच्याविरोधात कृषी विभागाने श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तसेच संबंधित गोदामातील युरियाचा साठा जप्त करण्यात आला आहे.
अहिल्यानगर कृषी विभागाच्या गुणनियंत्रण पथकाने टाकळीभान येथील शिवशंभो कृषी सेवा केंद्राच्या गोदामाची तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात युरिया व इतर रासायनिक खतांचा साठा आढळून आला. मात्र या साठ्याची नोंद अधिकृत साठा नोंदवहीत करण्यात आलेली नसल्याचे तपासात उघड झाले.
याप्रकरणी कृषी अधिकारी (गुणनियंत्रण) अभय मच्छिद्र थोरात यांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांना खतांचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून अडचणीत आणणाऱ्या विक्रेत्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक सुधाकर बोराळे यांनी स्पष्ट केले.
या प्रकरणाचा पुढील तपास श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे करीत आहेत.
प्रतिनिधी:दिलीप लोखंडे श्रीरामपूर










