जत तालुक्यात अवैध दारू विक्रीवर पोलिसांचा छापा;तिघांवर गुन्हे दाखल,मुद्देमाल जप्त
जत (प्रतिनिधी) : जत तालुक्यात अवैध दारूविक्री विरोधात पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे.पोलिसांनी तीन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून विदेशी व देशी दारूचा मोठा साठा जप्त केला असून,या प्रकरणी तिघांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.विठ्ठलनगर येथे पत्र्याच्या आडोशाला विदेशी दारू विक्रीसाठी बाळगल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
याप्रकरणी पोलिसांनी धर्मा मधुकर देवकर (वय ४८, रा. विठ्ठलनगर, जत) याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (ड) अंतर्गत गुन्हा दाखल केला.त्याच्याकडून विविध कंपन्यांच्या दारूच्या बाटल्यांसह एकूण ५ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस हवालदार शहापूरकर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
बागेवाडी येथे घराशेजारील आडोशामध्ये देशी दारू बाळगल्याप्रकरणी चंदू गणपती शिवशरण (वय ७७, रा. बागेवाडी) याच्याविरुद्ध कलम ६५ (ई) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्याच्याकडून ‘आयकॅप’ कंपनीच्या १८० मिलीच्या ४४ सीलबंद बाटल्या,ज्यांची किंमत ३ हजार ५२० रुपये आहे,जप्त करण्यात आल्या.या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार वगरे करत आहेत.
रामपूर ग्रामपंचायतसमोरील सरकारी दवाखान्याजवळ दिनेश दिलीप मंडले (वय २९, रा. रामपूर) हा देशी दारू विक्रीसाठी बाळगून असताना आढळला. त्याच्याविरुद्ध कलम ६५ (ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून,त्याच्याकडून ९० मिलीच्या १५ सीलबंद बाटल्या (किंमत ६०० रुपये) जप्त करण्यात आल्या.या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार मुल्ला करत आहेत.जत तालुक्यात अवैध दारूविक्रीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले असून,यावर कायमस्वरूपी प्रतिबंध घालण्यात यावा,अशी मागणी आता स्थानिक नागरिकांमधून जोर धरत आहे.
प्रतिनिधी : संजय कोळी.
७८७५९०३७७७.










