मुंबईत अनैतिक संबंधांतून रक्ताचा सडा; पत्नीसमोरच प्रियकराची गळा चिरून हत्या, आरोपी पतीला अवघ्या ३ तासात अटक
मुंबई:
राजधानी मुंबईच्या आरे कॉलनी परिसरात एका धक्कादायक हत्याकांडाने खळबळ उडाली आहे. अनैतिक संबंधांच्या संशयावरून पतीने आपल्या पत्नीच्या डोळ्यादेखत तिच्या प्रियकराची गळा चिरून निर्घृण हत्या केली. या घटनेनंतर पसार झालेल्या आरोपीला आरे पोलिसांनी वेगाने चक्रे फिरवत अवघ्या ३ तासात बेड्या ठोकल्या आहेत.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, आरे कॉलनीतील युनिट-५ मध्ये राहणाऱ्या भीमराज शर्मा (आरोपी पती) याला आपल्या पत्नीचे विकास भुसारे (मृत युवक) याच्याशी अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. याच रागातून भीमराजने शनिवारी रात्री विकासला ‘दारू पार्टी’च्या बहाण्याने आपल्या घरी बोलावले.
पार्टीचे रूपांतर रक्तरंजित वादात
दोघांमध्ये सुरुवातीला मद्यप्राशन सुरू असताना विकास आणि भीमराजमध्ये वादावादी झाली. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. संतापाच्या भरात भीमराजने पत्नीच्या समोरच विकासवर धारदार शस्त्राने हल्ला करत त्याचा गळा चिरला. यामध्ये विकासचा जागीच मृत्यू झाला.
पोलिसांची वेगवान कारवाई
हत्येनंतर आरोपी भीमराज शर्माने जवळच्या जंगलात पळ काढला होता. घटनेची माहिती मिळताच आरे पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी शोधमोहीम राबवून अवघ्या ३ तासांच्या आत आरोपीला जंगलातून शोधून काढले आणि त्याला अटक केली.
या घटनेमुळे आरे कॉलनी परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, आरे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429






