पिंपरी-चिंचवडकरांसाठी दिलासादायक निर्णय; अनेक गावांना नगर भूमापन कार्यालयाशी जोडण्यास मान्यता
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील बोपखेल, दिघी, वडमुखवाडी, चऱ्होली, चोवीसावाडी, डुडुळगाव, मोशी, चिखली, देहू, किन्हई, रावेत, मामुर्डी, किवळे आदी गावांना नगर भूमापन कार्यालय, पिंपरी-चिंचवड यांच्याशी संलग्न करण्यास महसूल विभागाने मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे नागरिकांना जमीन मोजणी, प्रॉपर्टी कार्ड तसेच विविध अभिलेख कामांसाठी होणारी गैरसोय दूर होणार आहे.
या संदर्भातील प्रस्तावाला राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंजुरी दिली असून, संबंधित आदेश लवकरच जारी होणार असल्याची माहिती मिळत आहे.
पूर्वी ही गावे हवेली ग्रामीण भूमि अभिलेख कार्यालयाशी जोडलेली असल्याने नागरिकांना विविध कामांसाठी वारंवार पुणे कार्यालयात जावे लागत होते. त्यामुळे वेळ आणि पैशांचा मोठा खर्च होत होता. आता नव्याने निर्माण होणाऱ्या नगर भूमापन कार्यालयाशी ही गावे जोडली जाणार असल्याने सर्व सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार आहेत.
या निर्णयामुळे जमीन मोजणी, प्रॉपर्टी कार्ड, नकाशे, अभिलेख दुरुस्ती आदी कामे अधिक सुलभ आणि जलद होणार असून नागरिकांची पायपीट थांबणार आहे. पिंपरी-चिंचवडकरांसाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक मानला जात आहे.
प्रतिनिधी: शाम शिरसाठ पुणे.










