आयएएस तुकाराम मुंढेंची दीड महिन्यात पुन्हा बदली; २१ वर्षांत बदलीची ‘सिल्व्हर जुबली’

प्रतिनिधी: तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली असून, त्यांच्या २१ वर्षांच्या प्रशासकीय सेवेत ही तब्बल २५ वी बदली ठरली आहे. त्यामुळे त्यांच्या बदलीची आता ‘सिल्व्हर जुबली’ झाल्याची चर्चा राज्याच्या प्रशासकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
मार्च २०२६ मध्ये महसूल, वन व आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सचिव म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला होता. मात्र अवघ्या दीड महिन्यांच्या कालावधीतच राज्य शासनाने त्यांची अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी नियुक्ती केली आहे.
धडक कारवाई, शिस्तप्रिय कार्यपद्धती आणि भ्रष्टाचाराविरोधातील कठोर भूमिकेमुळे तुकाराम मुंढे हे नेहमीच चर्चेत राहिले आहेत. विविध महापालिका, परिवहन विभाग तसेच प्रशासकीय खात्यांमध्ये त्यांनी केलेल्या कारवायांमुळे त्यांची “डॅशिंग अधिकारी” अशी ओळख निर्माण झाली आहे.
मुंबई, नाशिक, पुणे, नागपूरसह विविध ठिकाणी त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. मात्र त्यांच्या आक्रमक कार्यशैलीमुळे अनेकदा राजकीय व प्रशासकीय स्तरावर मतभेद निर्माण झाल्याची चर्चा देखील वेळोवेळी झाली. परिणामी त्यांच्या वारंवार बदल्या होत असल्याचे बोलले जाते.
दरम्यान, एवढ्या कमी कालावधीत झालेल्या नव्या बदलीमुळे प्रशासकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात असून, सोशल मीडियावरही याबाबत विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
प्रतिनिधी: शाम शिरसाठ पुणे.










