घोगरगावचे आनंद पटारे यांची एपीआय पदी निवड
प्रतिनिधी | टाकळीभान-
घोगरगाव येथील मूळ रहिवासी तथा न्यू इंग्लिश स्कूल टाकळीभानचे माजी विद्यार्थी आनंद मधुकर पटारे यांची नुकतीच पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) पदावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक (एपीआय) पदावर पदोन्नती झाली असून त्यांची नाशिक शहर येथे नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या यशामुळे घोगरगाव व परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शालेय जीवनापासूनच अभ्यासू, शिस्तप्रिय आणि मेहनती स्वभावामुळे आनंद पटारे यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवत पोलीस खात्यात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. टाकळीभानपासून अवघ्या चार ते पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या घोगरगाव येथील शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला.
प्राथमिक शिक्षण त्यांनी जि.प. प्राथमिक शाळा घोगरगाव येथे चौथीपर्यंत पूर्ण केले. त्यानंतर पाचवी ते बारावीपर्यंतचे शिक्षण टाकळीभान येथील न्यू इंग्लिश स्कूल व कै. आण्णासाहेब पटारे पाटील कनिष्ठ महाविद्यालयात घेतले. पुढे श्रीरामपूर येथील आर.बी.एन.बी. महाविद्यालयातून त्यांनी पदवी शिक्षण पूर्ण केले.
स्पर्धा परीक्षेची जिद्दीने तयारी करत त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली आणि पोलीस उपनिरीक्षक पदावर नियुक्ती मिळवली. आता एपीआय पदावर पदोन्नती झाल्याने त्यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल न्यू इंग्लिश स्कूल टाकळीभानचे शिक्षक, मित्रपरिवार, वर्गमित्र तसेच घोगरगाव ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. “आमचा वर्गमित्र आज उच्च पदावर पोहोचल्याचा आम्हाला अभिमान आहे,” अशा भावना त्यांच्या मित्रांनी व्यक्त केल्या.
सध्या नाशिक शहरात कार्यरत असलेले आनंद पटारे यांनी भविष्यातही प्रामाणिक व उत्कृष्ट सेवा देत गावाचे नाव उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छा सर्व स्तरातून व्यक्त होत आहेत.
प्रतिनिधी – शाम शिरसाठ पुणे








