संजय भोकरे कथित हत्या कट प्रकरणात ठाकरे सेनेचे दोन माजी पदाधिकारी ताब्यात :-
सांगली 21 मे : सांगलीतील अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष संजय भोकरे यांच्या कथित हत्या कट प्रकरणाला आता राजकीय रंग चढला आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्यांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे माजी शहर प्रमुख विराज भुटाले आणि माजी तालुका प्रमुख गणेश लोखंडे यांचा समावेश असल्याने खळबळ उडाली आहे.
मात्र, या दोघांवरील आरोप ठाकरे शिवसेनेने ठामपणे फेटाळून लावले आहेत. जिल्हाप्रमुख शंभूराज कटकर यांनी पत्रकार परिषद घेत पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “हे दोघेही अनेक वर्षांपासून पक्षासाठी काम करणारे शिवसैनिक आहेत. त्यांच्यावर गंभीर गुन्हे नाहीत. त्यांना जाणूनबुजून अडकवण्याचा प्रयत्न होत आहे,” असा आरोप त्यांनी केला.
कटकर यांनी सांगितले की, विराज भुटाले हे हॉटेल व्यवसायिक असून गणेश लोखंडे वीट-वाळू व नारळ व्यापाराशी संबंधित आहेत. “उदरनिर्वाहासाठी कुणाचा जीव घेण्याची त्यांची परिस्थिती नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, संजय भोकरे आणि त्यांच्या मुलाने यापूर्वीच पोलिस संरक्षणासाठी अर्ज दिला होता. तो अद्याप प्रलंबित असल्याचा दावा करत कटकर यांनी सरकारने त्यांना तातडीने ‘वाय’ किंवा ‘झेड’ दर्जाचे संरक्षण द्यावे, अशी मागणी केली.
या प्रकरणात जमिनीच्या वादाची पार्श्वभूमी असून तो विषय उच्च न्यायालयात प्रलंबित असल्याचेही त्यांनी नमूद केले. “दोन वेगवेगळ्या प्रकरणांची सांगड घालून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंतिम सत्य न्यायालयात समोर येईल,” असेही कटकर म्हणाले.
तसेच, “जर आमचे पदाधिकारी दोषी असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी. पण त्यांना राजकीय हेतूने अडकवले जात असेल, तर शिवसेना त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील,” असा इशाराही त्यांनी दिला.
विशेष म्हणजे, या प्रकरणात पोलिसांनी स्वतः फिर्यादी होत ‘सु-मोटो’ कारवाई केली आहे. यावरही कटकर यांनी आक्षेप घेत “ज्यांच्या हत्या कटाचा दावा केला जातो, त्यांची तक्रार असणे आवश्यक होते,” असे मत व्यक्त केले.
सध्या या प्रकरणाचा तपास सांगली पोलिसांकडून सुरू असून, पुढील घडामोडीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
पत्रकार :विजय रणभोर, पुणे
9359280220.










