केशवनगर प्रभाग क्रमांक १८ मध्ये पहिल्याच पावसात पाणी तुंबले; प्रशासनाच्या हलगर्जीपणावर संताप
चिंचवड : केशवनगर प्रभाग क्रमांक १८ मध्ये पहिल्याच पावसात अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. यामुळे प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराचे पितळ उघडे पडल्याची तीव्र प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
प्रशासनाला दरवर्षी कोणत्या भागात पाणी तुंबते याची पूर्ण कल्पना असतानाही अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली दिसत नाही. काही मोजक्याच लोकांची कामे प्राधान्याने केली जात असून सर्वसामान्य नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
राज पार्कच्या मागील परिसरात, शनी मंदिर परिसरात तसेच श्री शिवाजी उदय मंडळाजवळ मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. त्यामुळे नागरिकांना ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागला. अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाल्याने वाहनचालक आणि पादचाऱ्यांचे हाल झाले.
याबाबत भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहराचे महामंत्री मधुकर बच्चे यांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त करत तातडीने सर्वेक्षण करून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. अन्यथा दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्यात नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.
पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429










