चिखलीत ‘लेडी सिंघम’ची धाड ! विनापरवाना शेतमाल खरेदी करणाऱ्या अडत्यांवर सहकार विभागाचा मोठा दणका.


चिखलीत ‘लेडी सिंघम’ची धाड !
विनापरवाना शेतमाल खरेदी करणाऱ्या अडत्यांवर सहकार विभागाचा मोठा दणका


टाकळीभान प्रतिनिधी : चिखली (जि. बुलढाणा) येथे शेतकऱ्यांची लूट करून विनापरवाना शेतमाल खरेदी करणाऱ्या धनदांडग्या अडत्यांविरोधात अखेर सहकार प्रशासनाने आक्रमक पवित्रा घेत मोठी धाड टाकली. चिखली कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात झालेल्या या कारवाईमुळे अवैध व्यवहार करणाऱ्या व्यापाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
जिल्हा उपनिबंधक गीतेशचंद्र साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकत्याच नियुक्त झालेल्या सहाय्यक निबंधक तथा प्रशासन अधिकारी, अहिल्यानगर जिल्ह्यातील टाकळीभान येथील कन्या स्वरूपा प्रकाश धुमाळ यांनी ‘लेडी सिंघम’ स्टाईलमध्ये कारवाई करत अवैध अडत्यांचे धाबे दणाणून सोडले.
१५ मे २०२६ रोजी प्राप्त झालेल्या तक्रारीनंतर सहकार विभागाचे विशेष पथक १८ संशयित व्यापाऱ्यांच्या तपासणीसाठी मैदानात उतरले. कारवाईदरम्यान अनेक व्यापाऱ्यांची दुकाने बंद आढळली, तर काही व्यापारी कारवाईच्या भीतीने फरार झाल्याची चर्चा बाजार समिती परिसरात रंगली होती. तीन व्यापाऱ्यांची तपासणी अद्याप अर्धवट राहिली असून त्यांच्या विरोधात मोठी प्रशासकीय कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
तपासणीदरम्यान काही व्यापाऱ्यांकडे परवान्याची मुदत संपलेली असतानाही शेतमाल खरेदी सुरू असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले. त्यामुळे प्रशासन अधिक सतर्क झाले असून शासन नियमांना हरताळ फासून बेकायदेशीर खरेदी करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, सहकार प्रशासनाने स्पष्ट इशारा देत विनापरवाना शेतमाल खरेदी करणाऱ्यांची माहिती नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी थेट जिल्हा उपनिबंधक कार्यालय, बुलढाणा येथे द्यावी, असे आवाहन केले आहे.
चिखलीतील या धडक कारवाईमुळे अवैध अडत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून “पुढचा नंबर कोणाचा?” याचीच चर्चा सध्या बाजार समिती परिसरात रंगू लागली आहे.

पत्रकार: दिलीप लोखंडे श्रीरामपूर.


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!