सांगलीमध्ये चोरांचा धुमाकूळ ;पोलिसांनाच आव्हान :-
जि.सांगली. (संजयनगर):दि. 24 मे :-
संजय नगर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावरच चोरट्यांनी दिवसाढवळ्या तीन फ्लॅट फोडून पोलिसांनाच उघड आव्हान दिल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, एका पोलीस कर्मचाऱ्याच्या घरालाही चोरट्यांनी लक्ष्य केले.
सह्याद्री नगर आणि चिंतामण नगर परिसरातील घरफोड्यांमध्ये सुमारे २१ तोळे सोन्यासह लाखोंची रोकड चोरट्यांनी लंपास केली. सह्याद्री नगरमधील शिवबाळ दगडे अपार्टमेंटमध्ये राहणारे सेवानिवृत्त शिक्षक महेश शिंदे बाहेरगावी गेल्याची संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या फ्लॅटचा कडीकोयंडा उचकटत ८ तोळे सोन्याचे दागिने आणि रोकड चोरून नेली.
यानंतर चोरट्यांनी मोर्चा चिंतामण नगरकडे वळवत मयुरेश रेसिडेन्सीमधील संजय नगर पोलीस ठाण्याचे अंमलदार कपिल सावंत यांच्या फ्लॅटलाही लक्ष्य केले. त्याच इमारतीतील नरेंद्र खोकडे यांच्या घरातूनही ७ तोळे सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास करण्यात आली.
पोलीस कर्मचाऱ्याच्या घरातच चोरी झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून पोलिसांच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच उपअधीक्षक संदीप भागवत, पोलीस निरीक्षक सतीश कदम, उपनिरीक्षक ज्योतिराम भोसले आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
पत्रकार : विजय रणभोर, पुणे.
9359280220.








