Pune Nasarapur Case : नसरापूर प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेचा ‘गेम ओव्हर’; अवघ्या 28 दिवसांत कोर्टाचा मोठा निर्णय

पुणे प्रतिनिधी : पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे घडलेल्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणात न्यायालयाने वेगाने पावले उचलत आरोपी भीमराव कांबळेविरोधात मोठा निर्णय दिला आहे. अवघ्या 28 दिवसांत विशेष न्यायालयाने आरोपीविरोधात आरोप निश्चित केले असून आता या प्रकरणाची रोज सुनावणी होणार आहे.
विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालयात सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाने आरोपीविरोधात भक्कम पुरावे सादर केले. यामध्ये सीसीटीव्ही फुटेज, डीएनए अहवाल, फॉरेन्सिक तपासणी आणि तब्बल 82 साक्षीदारांची यादी न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. उपलब्ध पुरावे गंभीर स्वरूपाचे असल्याचे नमूद करत न्यायालयाने खटला जलदगतीने चालवण्याचे आदेश दिले.
हे संपूर्ण प्रकरण ‘इन-कॅमेरा’ पद्धतीने चालवले जाणार असून पीडित कुटुंबाच्या गोपनीयतेचे संरक्षण करण्यासाठी विशेष खबरदारी घेतली जाणार आहे.
दरम्यान, आरोपी भीमराव कांबळेने न्यायालयात स्वतःवर खोटा गुन्हा दाखल केल्याचा दावा केला. “मला किरकोळ मारामारीच्या प्रकरणात गोवण्यात आले,” असा युक्तिवाद आरोपीकडून करण्यात आला. मात्र, सरकारी पक्षाने सादर केलेल्या प्राथमिक पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपीचा दावा फेटाळला.
या घटनेमुळे राज्यभर संतापाची लाट उसळली होती. 1 मे रोजी आरोपीने चिमुरडीला खाऊचे आमिष दाखवत गोठ्यात नेले आणि तिच्यावर अत्याचार करून हत्या केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी वेगाने तपास पूर्ण करत दोषारोपपत्र दाखल केले होते.
आता या खटल्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले असून पीडितेला न्याय मिळावा, अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.
प्रतिनिधी: शाम शिरसाठ पुणे.








