डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहणारा तरुण बनला भिकारी; मुंबई पोलिसांच्या तत्परतेमुळे नांदेडच्या अभयचे पुनर्वसन


डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहणारा तरुण बनला भिकारी; मुंबई पोलिसांच्या तत्परतेमुळे नांदेडच्या अभयचे पुनर्वसन

मुंबई :नियतीचे चक्र कधी कोणाला कुठे नेऊन ठेवेल याचा नेम नसतो, याचाच प्रत्यय देणारी एक हृदयस्पर्शी घटना मुंबईत समोर आली आहे. डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहणारा नांदेडचा अभय बेळकोनी हा तरुण परिस्थितीच्या आघातामुळे मुंबईच्या रस्त्यावर भीक मागताना आढळला. मात्र, मालाड पोलिसांच्या संवेदनशीलतेमुळे आणि तत्परतेमुळे अभयला पुन्हा आपल्या कुटुंबाची साथ मिळाली आहे.

नांदेड येथील अभय बेळकोनी हा होमिओपॅथी (BHMS) शिक्षण घेत असलेला २५ वर्षीय विद्यार्थी आहे. काही महिन्यांपूर्वी त्याचा मोबाईल व महत्त्वाची कागदपत्रे चोरीला गेली होती. या घटनेचा त्याच्या मानसिकतेवर मोठा परिणाम झाला. मानसिक तणावातून तो घर सोडून मुंबईत आला. कोणताही आधार नसल्याने आणि परिस्थितीसमोर हतबल झाल्याने तो रस्त्यावर भीक मागून उदरनिर्वाह करू लागला होता.

दरम्यान, मालाड पोलिसांच्या बीट मार्शलची नजर अभयवर पडली. त्याच्या बोलण्यातून आणि वागणुकीतून तो सुशिक्षित असल्याचा संशय आल्याने पोलिसांनी त्याला विश्वासात घेत चौकशी केली. चौकशीतून त्याची ओळख पटली आणि पोलिसांनी नांदेडमधील त्याच्या कुटुंबाशी संपर्क साधला.

अभयचे वडील शिक्षक असून त्याचा भाऊ डॉक्टर असल्याची माहिती समोर आली. सुशिक्षित कुटुंबातील मुलगा अशा अवस्थेत पाहून पोलिसही भावूक झाले. मालाड पोलिसांनी तत्काळ अभयच्या वडिलांना मुंबईत बोलावून त्याला सुखरूप त्यांच्या स्वाधीन केले.

हरवलेला मुलगा पुन्हा घरी परतल्याने बेळकोनी कुटुंबाने मुंबई पोलिसांचे मनापासून आभार मानले असून पोलिसांच्या संवेदनशीलतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पत्रकार : उमेश कुलकर्णीमो. नं. : 9822548429


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!