फुगेवाडीत हाहाकार! विषारी हातभट्टी दारूमुळे ८ जणांचा मृत्यू
दोन सख्ख्या भावांसह आठ जणांचा बळी; चौघे अत्यवस्थ, परिसरात भीतीचे वातावरण

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील फुगेवाडी परिसरात हातभट्टीच्या विषारी दारूमुळे आठ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, आणखी चार जण अत्यवस्थ अवस्थेत उपचार घेत आहेत. अवघ्या २४ तासांत घडलेल्या या मृत्यूसत्रामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे मृतांमध्ये दोन सख्ख्या भावांचा समावेश असल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फुगेवाडी परिसरातील काही नागरिकांनी मंगळवारी रात्री एका गुत्त्यावर गावठी हातभट्टीची दारू प्राशन केली होती. त्यानंतर बुधवारी सकाळपासून संबंधितांना उलट्या, चक्कर, अस्वस्थता आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. काहींची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच एकामागून एक मृत्यू होत गेले.
या दुर्घटनेत पांडुरंग सखाराम फुगे (वय ५७), विजय प्रकाश राठोड (३१), राजेंद्र प्रकाश राठोड (३४), राजेश राजपूत (५१), अकबर अजीमखान पठाण (४८), बाबा सय्यद अली शेख (४४), आनंद निकाळजे आणि आनंद देसाई (सर्व रा. फुगेवाडी) यांचा मृत्यू झाला आहे. विजय आणि राजेंद्र राठोड हे सख्खे भाऊ असल्याची माहिती समोर आली आहे. तर भीमापा बसाप्पा पुजारी (३५), अक्षय अवसरमल (२०) आणि सुभाष डिग्गीकर (६५) हे रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
घटनेतील सर्व मृत आणि बाधित व्यक्ती अवघ्या चारशे मीटर परिसरात राहत असल्याने फुगेवाडीत भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे.
दरम्यान, काही मृत्यूंविषयी संभ्रमाचे वातावरण आहे. राजेश राजपूत यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा दावा केला आहे. तसेच पांडुरंग फुगे यांच्या शवविच्छेदनानंतर डॉक्टरांनीही हृदयविकाराचे प्राथमिक कारण नमूद केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र अनेक नागरिकांनी हातभट्टीच्या दारूमुळेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप केला आहे.
सोशल मीडियावर विषारी दारूमुळे सात ते आठ जणांचा मृत्यू झाल्याच्या चर्चा व्हायरल झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांची पथके तातडीने फुगेवाडीत दाखल झाली. पोलिसांनी परिसराची पाहणी करत नागरिकांकडून माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. संबंधित गुत्ता चालकांचा शोध घेतला जात असून, दारूचे नमुने तपासणीसाठी पाठविण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे समजते.
मात्र रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता. पोलिसांकडून अद्याप “संशयास्पद मृत्यू” अशी नोंद करण्यात आली असून, शवविच्छेदन अहवाल आणि रासायनिक तपासणीनंतरच नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, या घटनेनंतर शहरात अवैध हातभट्टी दारू विक्रीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. स्थानिक नागरिकांनी पोलिस प्रशासन आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
प्रतिनिधी: दयानंद साठे,पिंपरी चिंचवड.







