विषारी दारू प्रकरणात मोठी अपडेट! दारू विकणाऱ्या राहुल क्षीरसागरचा मृत्यू; तपास सीआयडीकडे जाण्याची शक्यता

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराला हादरवून सोडणाऱ्या विषारी दारू प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. हातभट्टीच्या विषारी दारूमुळे मृतांचा आकडा १५ च्या पुढे गेल्यानंतर आता या संपूर्ण प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे (CID) वर्ग करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, या प्रकरणातील महत्त्वाचा दुवा मानला जाणारा आणि दारू विक्रीत सहभागी असल्याचा आरोप असलेला राहुल क्षीरसागर याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
हडपसर आणि फुगेवाडी परिसरात गेल्या दोन दिवसांत विषारी दारू प्राशनामुळे अनेकांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर अवस्थेत विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी मुख्य आरोपी योगेश वानखेडेसह काही जणांना ताब्यात घेतले असून, अवैध हातभट्टी व्यवसायाचे मोठे जाळे उघड होण्याची शक्यता आहे.
तपासादरम्यान राहुल क्षीरसागर हा स्थानिक पातळीवर दारू पुरवठा आणि विक्री साखळीतील महत्त्वाचा दुवा असल्याचे समोर आले होते. मात्र त्याचाच मृत्यू झाल्याने तपासाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
दरम्यान, वाढता मृतांचा आकडा, अवैध दारू माफियांचे जाळे आणि स्थानिक पातळीवरील संभाव्य संगनमत या पार्श्वभूमीवर राज्य सरकार गंभीर झाले आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
पुणे पोलिसांकडून अवैध दारू अड्ड्यांवर धडक कारवाई सुरू करण्यात आली असून अनेक ठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत. या प्रकरणात आणखी काही मोठी नावे समोर येण्याची शक्यता पोलिस सूत्रांनी व्यक्त केली आहे.
घटनेनंतर नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.
प्रतिनिधी: शाम शिरसाठ पुणे






