पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ८८ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सेवानिवृत्ती सन्मान.


पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ८८ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सेवानिवृत्ती सन्मान
पिंपरी, दि. २९ मे २०२६: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सेवेतून नियत वयोमानानुसार तसेच स्वेच्छानिवृत्ती स्वीकारलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या सेवाकाळात प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि कर्तव्यभावनेतून दिलेले योगदान शहराच्या विकासासाठी आणि संस्थेच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण ठरले असल्याचे गौरवोद्गार आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी काढले. तसेच भविष्यात सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या दिवशीच निवृत्तीवेतन आदेश आणि देय रकमेचा लाभ देण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागांना दिल्या.
संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सन्मान समारंभात मे २०२६ अखेर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या ७२ आणि स्वेच्छानिवृत्ती स्वीकारलेल्या १६ अशा एकूण ८८ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, उपआयुक्त तानाजी नरळे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, पिंपरी-चिंचवड कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजर्डे यांच्यासह विविध विभागांतील अधिकारी-कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समारंभात बोलताना आयुक्त डॉ. सूर्यवंशी म्हणाले, “महापालिकेतील प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्याने आपल्या कार्यकाळात जबाबदारीची जाणीव ठेवून उत्कृष्ट सेवा बजावली आहे. सेवानिवृत्तीनंतरचा काळ हा आयुष्यातील नवीन पर्व असतो. या काळात समाजकार्यात सक्रिय सहभाग घेत आनंदी, समाधानकारक आणि आरोग्यपूर्ण जीवन जगावे. कुटुंबीयांनीही त्यांच्या योगदानाचा सन्मान राखत त्यांना आदराने वागणूक द्यावी.”
अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांनीही सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, “सेवानिवृत्ती ही केवळ शासकीय प्रक्रियेपुरती मर्यादित असते. मनातील सेवाभाव कधीही निवृत्त होत नाही. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आजवर जपलेली लोकसेवा, कर्तव्यनिष्ठा आणि अनुभवाचा लाभ पुढील पिढीला मिळावा. शहराच्या विकास प्रक्रियेत मार्गदर्शक म्हणून त्यांनी पुढेही योगदान द्यावे.”
यावेळी महापालिकेच्या विविध विभागांतील अधिकारी, शिक्षक, आरोग्य कर्मचारी, तांत्रिक कर्मचारी, सफाई कर्मचारी तसेच इतर कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमात सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सेवाकार्याचा विशेष उल्लेख करून शहराच्या विकासातील त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपआयुक्त तानाजी नरळे यांनी केले, तर सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले. सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीमुळे हा सन्मान सोहळा भावनिक आणि संस्मरणीय ठरला.

प्रतिनिधी: शाम शिरसाठ,पुणे


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!