माणुसकीची खरी श्रीमंती! निमंत्रणाशिवाय लग्नाला आलेल्या व्यक्तीने नवरीला दिली १० रुपयांची भेट; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
पैशांच्या श्रीमंतीपेक्षा मनाची श्रीमंती किती मोठी असते, याचा प्रत्यय देणारी एक घटना सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. आसाममधील एका लग्नसोहळ्यात साधे कपडे आणि चेहऱ्यावर निरागस भाव असलेली एक विशेष व्यक्ती कोणाच्याही निमंत्रणाशिवाय पोहोचली. मात्र, तिथल्या उपस्थितांनी दाखवलेली माणुसकी आणि त्या व्यक्तीने दिलेली भेट पाहून अनेकांचे डोळे पाणावले आहेत.
लग्नात ही व्यक्ती शांतपणे पाहुण्यांमध्ये बसली, जेवली आणि सर्वांसोबत आनंदाने वेळ घालवला. तिथे आलेल्या कोणत्याही पाहुण्याने किंवा यजमानांनी त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने पाहिले नाही किंवा त्यांना तिथून जाण्यास सांगितले नाही. मात्र, खरा भावूक क्षण तो आला जेव्हा ही व्यक्ती तिथून निघू लागली.
नवरीला पाहताच या व्यक्तीचे डोळे पाणावले. त्यांनी आपल्या खिशातील १० रुपयांची एक साधी नोट काढली आणि ‘शगुन’ म्हणून नवरीच्या हातात ठेवली. ती केवळ १० रुपयांची नोट नव्हती, तर त्यामागे प्रेम, आदर आणि माणुसकीची मोठी भावना होती.
स्वतःकडे फार काही नसतानाही दुसऱ्याला देण्याची ही वृत्ती लाखो लोकांच्या मनाला स्पर्श करून गेली आहे. “माणुसकीची खरी श्रीमंती ही पैशांपेक्षा खूप मोठी असते,” असा संदेश या घटनेतून मिळत असून, नेटकऱ्यांकडून या व्हिडिओवर आणि त्या लग्नघरातील लोकांच्या वागण्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429










