नांदेड — SBI शाखेतील लॉकरमधून ८० तोळे सोने लंपास; दोन अधिकाऱ्यांवर गुन्हा
नांदेडमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) नांदेड शाखेतील ग्राहकांच्या लॉकरमधील ८० तोळे (सुमारे ₹85.81 लाख किमतीचे) अस्सल सोने गायब झाल्याचा संशयास्पद प्रकरण समोर आले आहे. हा प्रकार बँकेच्या नियमित अंतर्गत हिशोब तपासणी दरम्यान आढळून आला असून, बँकेने वजीराबाद पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.
पोलीस तपासात कॅश मॅनेजर आदित्य सेनगावकर व सर्व्हिस मॅनेजर जीवन जगदाळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासानुसार, आरोपींनी संगनमत करून लॉकरमधील ८० तोळे अस्सल सोने चोरी केले आणि ते विकून किंवा गहाण ठेवून मिळालेले पैसे थेट शेअर मार्केटमध्ये गुंतवले. शेअर बाजारात हे गुंतवणूकीचे पैसे बुडाल्याने ते परत मिळाले नाहीत, असे प्राथमिक तपासात समोर आलं आहे.
आरोपींनी आपले कारस्थान लपवण्यासाठी आणि बँक प्रशासनाला गोंधळात टाकण्यासाठी लॉकरमध्ये दिसणारे ४० तोळे बनावट सोने ठेवले होते. वजीराबाद पोलीस ठाण्याने तातडीने कारवाई करून एका संशयिताला ताब्यात घेतले असून, मुख्य आरोपी सध्या पळून असल्याचे पोलिस सांगत आहेत; त्याचा शोध सुरु आहे.
पोलीस तपासात लॉकर एक्सेस लॉग, सीसीटीव्ही फुटेज, बँकेच्या नोंदी आणि शेअर ट्रेडिंगचे व्यवहार तपासले जात आहेत. या प्रकरणामुळे बँकेतील ग्राहकवर्ग आणि स्थानिक समाजात मोठी खळबळ उडाली असून बँकेनेही आंतरिक चौकशी सुरु केली आहे. वजीराबाद पोलीस पुढील तपासानंतर अधिकृत अहवाल देतील आणि आवश्यक त्या कायदेशीर कारवाई करतील.
पत्रकार उमेश कुलकर्णी 9822548429










