पेट्रोल-डिझेलनंतर आता कमर्शियल गॅस सिलिंडर महागला

पुणे प्रतिनिधी: देशातील सर्वसामान्यांना महागाईचा आणखी एक झटका बसला आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीनंतर आता व्यावसायिक वापराच्या (कमर्शियल) एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. तेल विपणन कंपन्यांनी १ जूनपासून नवीन दर लागू केले आहेत.
नवीन दरानुसार, दिल्लीत १९ किलोच्या कमर्शियल एलपीजी सिलिंडरची किंमत ४२ रुपयांनी वाढून ३,११३.५० रुपये झाली आहे. तर कोलकात्यात याच सिलिंडरची किंमत ५३.५० रुपयांनी वाढून ३,२५५.५० रुपयांवर पोहोचली आहे.
याशिवाय, ५ किलोच्या फ्री ट्रेड एलपीजी (FTL) सिलिंडरच्या किमतीतही ११ रुपयांची वाढ करण्यात आली असून त्याची नवीन किंमत ८२१.५० रुपये झाली आहे.
या दरवाढीचा परिणाम हॉटेल, रेस्टॉरंट, खाद्यपदार्थ विक्रेते आणि इतर व्यावसायिक आस्थापनांवर होण्याची शक्यता आहे. परिणामी, खाद्यपदार्थांच्या किमतींवरही दबाव वाढू शकतो.
दरम्यान, घरगुती वापराच्या १४.२ किलो एलपीजी सिलिंडरच्या किमतीत सध्या कोणताही बदल करण्यात आलेला नसल्याचे तेल कंपन्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. नवीन दर १ जून २०२६ पासून देशभर लागू झाले आहेत.
प्रतिनिधी: शाम शिरसाठ पुणे.










