हप्तेखोरी करून दारूच्या भट्ट्या चालवणाऱ्यांना वंचितचा इशारा; उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही – डॉ. अनिल जाधव

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात हप्तेखोरीच्या जोरावर अवैधरित्या दारूच्या भट्ट्या चालवल्या जात असतील, तर अशा प्रकारांना वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून कडाडून विरोध केला जाईल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अनिल जाधव यांनी दिला.
अलीकडेच पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी दारूमुळे अनेक नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही भूमिका मांडली. अवैध दारू व्यवसायामुळे सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळ होत असून, संबंधितांवर कठोर कारवाई होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. जाधव म्हणाले, “जर कोणाच्या आशीर्वादाने किंवा हप्तेखोरीच्या माध्यमातून शहरात दारूच्या भट्ट्या उभ्या राहत असतील, तर अशा बेकायदेशीर व्यवसायांना वंचित बहुजन आघाडी कधीही पाठिंबा देणार नाही. जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या या प्रकारांना आम्ही रस्त्यावर उतरून विरोध करू. गरज पडल्यास आंदोलन छेडून संबंधितांना उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही.”
तसेच, अवैध दारू निर्मिती आणि विक्री रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने अधिक प्रभावी कारवाई करावी, दोषींना कठोर शिक्षा व्हावी आणि अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, अशी मागणीही त्यांनी केली.
विषारी दारू प्रकरणामुळे शहरात निर्माण झालेल्या चिंतेच्या वातावरणात डॉ. अनिल जाधव यांच्या या विधानाची राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
प्रतिनिधी: शाम शिरसाठ पुणे









