एमआरपीच्या नावाखाली ग्राहकांची लूट थांबवा; अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन:-


एमआरपीच्या नावाखाली ग्राहकांची लूट थांबवा; अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन:-

जि.अहिल्यानगर:-दि. 2 जून :-वस्तूंवरील छापील कमाल किरकोळ किंमत (एमआरपी) पेक्षा अधिक दर आकारून ग्राहकांची होत असलेली आर्थिक फसवणूक तातडीने थांबवावी तसेच एमआरपी संदर्भात देशात सक्षम आणि प्रभावी कायदा करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायत, अहिल्यानगर जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शांततापूर्ण जनजागृती आंदोलन करण्यात आले. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.

अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जिल्हाध्यक्ष शाहूराव औटी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. निवेदनामध्ये ग्राहकांच्या हिताशी संबंधित अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले.

संघटनेने केंद्र शासनाकडे एमआरपीसंदर्भात सुधारित व कठोर कायदा करण्याची मागणी केली आहे. तसेच एमआरपीची पडताळणी आणि नियंत्रणासाठी स्वतंत्र वैधानिक प्राधिकरण स्थापन करावे, अशीही मागणी करण्यात आली. बाजारपेठेत वाढीव एमआरपी, खोटी सूट आणि दिशाभूल करणाऱ्या किंमत धोरणांवर कठोर निर्बंध आणण्याची आवश्यकता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

ग्राहकांना वस्तूंच्या किमतीबाबत संपूर्ण पारदर्शकता मिळावी यासाठी प्रत्येक उत्पादनावर एमआरपीसोबत मूळ उत्पादन खर्चही छापणे बंधनकारक करावे, अशी मागणी करण्यात आली. याशिवाय औषधे आणि अत्यावश्यक वस्तूंच्या किमतींवर विशेष नियंत्रण यंत्रणा लागू करून सर्वसामान्य नागरिकांची होणारी आर्थिक लूट थांबवावी, असेही निवेदनात म्हटले आहे.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना जिल्हाध्यक्ष शाहूराव औटी म्हणाले, “सध्या अनेक ठिकाणी ग्राहकांकडून छापील किमतीपेक्षा अधिक दर आकारले जात आहेत. किमतींमध्ये पारदर्शकतेचा अभाव असल्यामुळे ग्राहकांचे आर्थिक नुकसान होत आहे. ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण आणि जनजागृती हेच या आंदोलनामागील प्रमुख उद्दिष्ट आहे.

प्रशासनाने या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन दोषी व्यापारी व ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांविरोधात कठोर कारवाईसाठी केंद्र व राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवावा, अशी मागणी ग्राहक पंचायतीच्या वतीने करण्यात आली.

पत्रकार : विजय रणभोर, पुणे.
9359280220.


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!