सिटी सर्वे क्रमांक 1101 व 1107-ब वरील अतिक्रमण हटविण्याची मागणी; वाई नगरपरिषदेला पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा आंदोलनाचा इशारा:-


सिटी सर्वे क्रमांक 1101 व 1107-ब वरील अतिक्रमण हटविण्याची मागणी; वाई नगरपरिषदेला पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा आंदोलनाचा इशारा:-

जि. सातारा.ता.वाई :दि. 2 जून :-वाई नगरपरिषद हद्दीतील सिटी सर्वे क्रमांक 1101 व 1107-ब, ब्राह्मणशाही परिसरातील रस्ता रुंदीकरणासाठी आरक्षित जागेवरील अतिक्रमण तात्काळ हटवावे तसेच पाणीपुरवठा विभागातील कामकाजाची चौकशी करावी, अन्यथा पंधरा दिवसांनंतर वाई नगरपरिषद कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा पीपल्स रिपब्लिकन पार्टीने दिला आहे.

पक्षाच्या वतीने मुख्याधिकारी संजीवनी दळवी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सिटी सर्वे क्रमांक 1107-ब व 1101 येथील सुमारे 27.194 चौरस मीटर क्षेत्र रस्ता रुंदीकरणासाठी आरक्षित आहे. मात्र, या जागेवर गेल्या दोन ते तीन वर्षांपासून एका सायकल विक्रीच्या व्यावसायिक दुकानाचे अतिक्रमण असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यापूर्वीही या संदर्भात तीन ते चार वेळा नगरपरिषदेकडे पत्रव्यवहार करण्यात आला होता. तसेच नगरविकास विभागामार्फतही अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप पक्षाने केला आहे.

यासोबतच वाई नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कामकाजावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. माहिती अधिकारांतर्गत मागविलेल्या माहितीनुसार ऑक्टोबर 2025 ते एप्रिल 2026 या कालावधीत जलवाहिन्यांच्या दुरुस्ती व पाणीपुरवठा देखभालीसाठी ठेकेदार तेज ट्रेडर्स यांना देयके अदा करण्यात आल्याचे समोर आले. मात्र, संबंधित कामांचे अहवाल, छायाचित्रे किंवा प्रत्यक्ष काम पूर्ण झाल्याचे पुरावे उपलब्ध करून देण्यात आले नसल्याचा दावा करण्यात आला आहे.

पाणीपुरवठा अधिकारी जाधव आणि संबंधित ठेकेदार यांच्यात संगनमत होऊन आर्थिक व्यवहार झाले असावेत, अशी शंका व्यक्त करत या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

पंधरा दिवसांत अतिक्रमण हटविणे, चौकशी सुरू करणे व लेखी उत्तर देणे याबाबत कोणतीही कार्यवाही न झाल्यास वाई नगरपरिषद कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल. त्यानंतरही दखल न घेतल्यास सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही पक्षाने दिला आहे.

पत्रकार : विजय रणभोर, पुणे.
9359280220.


 


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!