अहिल्यानगर पोलीस दलातील कर्तव्यदक्ष ‘खाकी’चा गौरव; अनिल शेंगाळे यांची पोलीस हवालदारपदी पदोन्नती
१३ वर्षे गोपनीय विभागात उल्लेखनीय सेवा; विविध पोलीस ठाण्यांमध्ये बजावली जबाबदारी

टाकळीभान प्रतिनिधी : कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि उत्कृष्ट कार्यशैलीच्या जोरावर अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलात गेली १६ वर्षे उल्लेखनीय सेवा बजावणारे पोलीस अंमलदार अनिल शेंगाळे यांना पोलीस हवालदार पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. त्यांच्या या पदोन्नतीमुळे पोलीस दलासह सामाजिक क्षेत्रातूनही त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
मूळचे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील नळवणे गावचे रहिवासी असलेले आणि सध्या राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथे वास्तव्यास असलेले अनिल शेंगाळे यांनी बी.ए.पर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे. शिक्षणासोबतच समाजसेवा आणि पोलीस सेवेची आवड जोपासत त्यांनी नगर जिल्हा पोलीस दलात प्रवेश केला आणि आपल्या कार्याचा ठसा उमटवला.
शेंगाळे यांनी आपल्या १६ वर्षांच्या सेवाकाळात अत्यंत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या गोपनीय विभागात सलग १३ वर्षे कार्य केले. गुन्हेगारीविरोधी माहिती संकलन, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक गुप्त माहिती पुरविणे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना अचूक माहिती उपलब्ध करून देण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली.
सेवाकाळात त्यांनी अकोले पोलीस स्टेशन, आश्वी पोलीस स्टेशन आणि श्रीरामपूर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे यशस्वीपणे कर्तव्य बजावले. सध्या ते अपर पोलीस अधीक्षक कार्यालय, श्रीरामपूर येथे महत्त्वाच्या जबाबदारीवर कार्यरत आहेत.
त्यांच्या पदोन्नतीनिमित्त श्रीरामपूर विभागाचे सोमनाथ वाकचौरे, चारुदत्त धोंडे, तसेच आप्पासाहेब खंडाळ आणि राजेंद्र गोडगे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व सहकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
संयमी, अभ्यासू आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असलेल्या अनिल शेंगाळे यांच्या पदोन्नतीमुळे राहुरी, श्रीरामपूर, आश्वी आणि अकोले परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यावेळी पोलीस हवालदार रविंद्र चव्हाण, रामेश्वर ढोकणे, सचिन धनाड, रामेश्वर वेताळ, काका मोरे, संदीप दरंदले, किशोर हिंगे, संभाजी वरे यांच्यासह सहकारी पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि मित्रपरिवाराने त्यांचे अभिनंदन केले.
प्रतिनिधी: दिलीप लोखंडे श्रीरामपूर.










