परशुराम सहकारी पतसंस्था गैरव्यवहार प्रकरणी हिंदू महासभेचा आक्रमक पवित्रा; पोलीस आयुक्तांना निवेदन
पिंपरी-चिंचवड, प्रतिनिधी :
संभाजीनगर (चिंचवड) येथील परशुराम सहकारी पतसंस्थेतेतील गैरव्यवहार प्रकरणी हिंदू महासभा आणि पीडित ठेवीदारांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकरणातील दोषींवर तातडीने कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी आज पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त चौबे यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले.
परशुराम सहकारी पतसंस्थेत जवळपास ३०० ठेवीदारांचे पैसे अडकले असून त्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ऑगस्ट २०२४ पासून विविध शासकीय यंत्रणांकडे तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने ठेवीदारांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
हिंदू महासभेने दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी २०२४ मध्ये उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे यांच्याकडे पहिली तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर ऑगस्ट २०२४ मध्ये निगडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. फेब्रुवारी २०२५ मध्ये हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले. मात्र त्यानंतर फेब्रुवारी २०२६ मध्ये प्रकरण पुन्हा उपनिबंधक कार्यालयाकडे पाठविण्यात आले. ११ मे २०२६ रोजी आयुक्त दरबारात तक्रार केल्यानंतर प्रकरण निगडी पोलीस ठाण्याकडे सोपविण्यात आले, तर १७ मे २०२६ रोजी ते पुन्हा उपनिबंधक कार्यालयाकडे वर्ग करण्यात आले.
सतत सुरू असलेल्या या टोलवाटोलवीमुळे प्रशासनावरील विश्वास कमी होत असल्याचा आरोप हिंदू महासभेने केला आहे. तसेच पतसंस्थेचे अध्यक्ष, संचालक मंडळ व संबंधित दोषींवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावेत, पीडित ठेवीदारांचे पैसे परत मिळवण्यासाठी विशेष यंत्रणा कार्यान्वित करावी आणि प्रकरणातील दिरंगाईस जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करावी, अशा प्रमुख मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, या प्रकरणात तातडीने कारवाई न झाल्यास पीडित ठेवीदारांच्या न्यायासाठी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा हिंदू महासभेने प्रशासनाला दिला आहे.
– उमेश कुलकर्णी
लोक १ न्यूज,










