किल्ले पारगडवर भीषण पाणीटंचाई; शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तोंडावर शिवप्रेमींमध्ये संताप:-


किल्ले पारगडवर भीषण पाणीटंचाई; शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तोंडावर शिवप्रेमींमध्ये संताप:-

जि.कोल्हापूर:(चंदगड):दि. 5 जून :-ऐतिहासिक वारसा लाभलेल्या चंदगड तालुक्यातील किल्ले पारगडवर गेल्या सहा ते सात वर्षांपासून पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर बनला आहे. दरवर्षी मार्च महिन्यापासून गडावरील ऐतिहासिक तलाव आणि विहिरी कोरड्या पडत असून यंदाही भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यामुळे पर्यटक, शिवप्रेमी आणि स्थानिक ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गडावरील नागरिक व पर्यटकांना बारमाही पाणी उपलब्ध व्हावे यासाठी नळ पाणीपुरवठा योजना मंजूर होऊन पाच वर्षांहून अधिक कालावधी लोटला आहे. मात्र, आजतागायत ही योजना पूर्णत्वास गेलेली नाही. यासाठी ग्रामस्थांनी चंदगड पंचायत समितीसमोर तीन वेळा आमरण उपोषण केले. प्रत्येक वेळी प्रशासनाने आश्वासने दिली; परंतु प्रत्यक्षात कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

दरवर्षी ६ जून रोजी किल्ले पारगड येथे शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शहीद जवान वेल्फेअर असोसिएशन (कार्वे), पारगड ग्रामस्थ तसेच महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकातील शिवप्रेमी यांच्या पुढाकारातून हा सोहळा आयोजित केला जातो. हजारो शिवभक्त यावेळी गडावर मुक्कामी असतात.

तसेच जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ५ जून रोजी ‘आऊट प्ले स्पोर्ट्स फाउंडेशन’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेसाठी देशभरातून सुमारे तीन हजार धावपटू गडावर दाखल होणार आहेत. मात्र, पाण्याअभावी आयोजकांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे.

गडावरील पाणीटंचाई लक्षात घेता ५ आणि ६ जून रोजी होणाऱ्या विविध कार्यक्रमांसाठी तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. गडावरील घरांमध्ये मुक्कामी राहणारे धावपटू, शिवभक्त आणि पर्यटक यांना पुरेसे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने विशेष उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

तसेच तालुक्यातील विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी स्वतः गडावर उपस्थित राहून परिस्थितीची पाहणी करावी आणि आवश्यक सहकार्य करावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.

शिवराज्याभिषेक सोहळा आणि आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा तोंडावर असताना प्रशासन या गंभीर प्रश्नाकडे कितपत गांभीर्याने लक्ष देते, याकडे शिवप्रेमी, धावपटू आणि स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.

पत्रकार : विजय रणभोर, पुणे.
9359280220.


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!