हातिवडेच्या सानिका पाटीलची भारतीय सैन्यात भरारी; वूमन मिलिटरी पोलीस दलात निवड:-


हातिवडेच्या सानिका पाटीलची भारतीय सैन्यात भरारी; वूमन मिलिटरी पोलीस दलात निवड:-

जि.कोल्हापूर. (आजरा):दि. 5 जून :-तालुक्यातील हातिवडे गावची सुकन्या कु. सानिका शंकर पाटील हिने वूमन मिलिटरी पोलीस भरती प्रक्रियेत उल्लेखनीय यश संपादन करत भारतीय सैन्यात स्थान मिळवले आहे. तिच्या या यशामुळे हातिवडे गावासह संपूर्ण परिसरात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

बालपणापासूनच देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगलेल्या सानिकाने इयत्ता बारावीपासून राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) मध्ये प्रवेश घेतला आणि तीन वर्षांचा अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला. एनसीसीमधील उत्कृष्ट कामगिरी, नेतृत्वगुण आणि शिस्तबद्ध वर्तनामुळे तिची निवड नवी दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ऐतिहासिक कर्तव्यपथावरील संचलनासाठी झाली होती. देशाच्या प्रतिष्ठित परेडमध्ये सहभागी होण्याचा मान तिने अभिमानाने मिळवला होता.

कर्तव्यपथावरील संचलनानंतर सानिकाने भारतीय सैन्याच्या वूमन मिलिटरी पोलीस दलात भरती होण्याचे ध्येय निश्चित करून कठोर परिश्रम सुरू ठेवले. सातत्यपूर्ण सराव, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर तिने अखेर हे स्वप्न साकार केले.

वडील शंकर पाटील आणि आई पल्लवी पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन, प्रोत्साहन आणि पाठबळ लाभले. कुटुंबीयांच्या सहकार्यामुळेच हा यशस्वी प्रवास शक्य झाल्याची भावना सानिकाने व्यक्त केली.

हातिवडे गावातून भारतीय सैन्यात वूमन मिलिटरी पोलीस दलात निवड होणारी सानिका ही पहिलीच तरुणी ठरली आहे. तिच्या या ऐतिहासिक यशामुळे ग्रामीण भागातील मुलींना नवी प्रेरणा मिळाली असून शिक्षण, शिस्त आणि मेहनतीच्या बळावर कोणतेही ध्येय गाठता येते, हे तिने सिद्ध करून दाखवले आहे.

सानिकाच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल हातिवडे गावासह संपूर्ण पंचक्रोशीतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून विविध सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय स्तरांतून तिचा गौरव केला जात आहे.

पत्रकार : विजय रणभोर, पुणे.
9359280220.


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!