७ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पुणे, मुंबई, अमरावतीसह अनेक ठिकाणी मोठे फेरबदल
मुंबई (प्रतिनिधी):
महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने राज्य पोलीस सेवेतील (रा.पो.से.) वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत एक महत्त्वाचा शासन आदेश जारी केला आहे. पोलीस आस्थापना मंडळ क्रमांक १ च्या शिफारशींनुसार ७ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नवीन पदस्थापना करण्यात आल्या आहेत. हा आदेश महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ च्या कलम २२-न अंतर्गत जारी करण्यात आला असून, यामध्ये मुंबई, पुणे, अमरावतीसह अनेक महत्त्वाच्या शहरांमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
दिनेश बारी पुण्यात, तर यशवंत सोळंके अमरावतीत
या नव्या आदेशानुसार, मुंबई येथे पोलीस उपआयुक्त (दक्षिण विभाग) म्हणून कार्यरत असलेले दिनेश गिरिधर बारी यांची पुणे येथे पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग (CID) या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. नागपूर येथील अँटी नक्षल टास्क फोर्सचे (ANTF) अपर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके यांची अमरावती शहर येथे परिमंडळ-१ चे पोलीस उपआयुक्त म्हणून बदली झाली आहे.
तसेच, नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले संदीप जाधव यांची राज्य पोलीस नियंत्रण कक्षाच्या पोलीस अधीक्षकपदी वर्णी लागली आहे. तर यापूर्वी राज्य पोलीस नियंत्रण कक्षाचे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असलेले शशिकांत देवराज बोराटे यांची मीरा-भाईंदर, वसई-विरार येथे पोलीस उपआयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
महिला अधिकाऱ्यांवर सागरी सुरक्षेची मोठी जबाबदारी
महिला अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये स्मिता अभिषेक पाटील यांच्यावर गृह विभागाने अत्यंत महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ (मुंबई) च्या पोलीस अधीक्षक असलेल्या स्मिता पाटील यांची आता राज्य गुप्तवार्ता विभाग (सागरी सुरक्षा) च्या उपआयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.
पूर्वीचे बदली आदेश रद्द, दोन अधिकाऱ्यांना नवीन निर्देश
या प्रशासकीय फेरबदलात पूर्वी झालेल्या बदल्यांचे आदेशही बदलण्यात आले आहेत. १५ मे २०२६ रोजी झालेल्या आदेशात बदल करत मितेश घट्टे यांची जुनी बदली रद्द करण्यात आली असून, त्यांची मुंबई शहर येथे पोलीस उपआयुक्त म्हणून पदस्थापना करण्यात आली आहे.
दुसरीकडे, पुणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या (CID) पोलीस अधीक्षक वैशाली माने यांचीही १५ मे रोजी झालेली बदली रद्द करण्यात आली आहे. त्यांना सध्या कोणत्याही पदावर न पाठवता नियुक्तीच्या प्रतीक्षेत (Waiting) ठेवण्यात आले असून, त्यांच्या पुढील पदस्थापनेबाबत गृह विभाग स्वतंत्र आदेश काढणार असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.
पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429









