महागाईचा दुहेरी फटका: गॅस सिलेंडर महागल्यानंतर सलूनचे दरही २० टक्क्यांनी वाढले
मुंबई :सर्वसामान्य नागरिकांना आज महागाईचा दुहेरी झटका बसला आहे. एकीकडे घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात २९ रुपयांची वाढ झाली असून, गेल्या तीन महिन्यांत सिलेंडरच्या किमतीत एकूण ८९ रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे आधीच वाढत्या महागाईने त्रस्त असलेल्या नागरिकांच्या घरगुती बजेटवर अतिरिक्त ताण पडला आहे.
याचदरम्यान, बीड जिल्ह्यात महाराष्ट्र नाभिक महामंडळाने सलून सेवांच्या दरात २० टक्के वाढ करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. वाढत्या महागाईचा परिणाम, दुकानांचे भाडे, वीजबिल, कर्मचारी वेतन तसेच सलूनमध्ये वापरल्या जाणाऱ्या साहित्याच्या वाढलेल्या किमती यामुळे दरवाढ अपरिहार्य असल्याचे सलून व्यावसायिकांनी स्पष्ट केले आहे.
या निर्णयामुळे आता केस कापणे, दाढी करणे, फेशियलसह इतर सलून सेवांसाठी ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. गॅस सिलेंडरच्या वाढलेल्या दरांमुळे घरखर्च वाढला असतानाच सलून सेवांच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे.
महागाईच्या या दुहेरी फटक्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण असून, दैनंदिन जीवनावश्यक खर्चाचा भार दिवसेंदिवस वाढत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
पत्रकात उमेश कुलकर्णी
9822548429









