स्वच्छ आणि हरित पिंपरी-चिंचवडच्या दिशेने महापौर रवि लांडगे यांचा पुढाकार

पिंपरी, प्रतिनिधी : शहर अधिक स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक करण्याच्या उद्देशाने “स्वच्छ आणि हरित पिंपरी-चिंचवड” ही महत्त्वाकांक्षी संकल्पना महापौर रवि लांडगे यांनी मांडली आहे. या उपक्रमांतर्गत शहरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपणासह स्वच्छतेवर विशेष भर देण्यात येणार असून लोकसहभागातून विविध स्वच्छता मोहिमा राबविण्याच्या सूचना त्यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या आहेत.
यासंदर्भात महापौर रवि लांडगे यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना निवेदन सादर केले आहे. शहराच्या झपाट्याने वाढणाऱ्या विस्ताराचा विचार करता स्वच्छता ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.
या उपक्रमांतर्गत प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत “स्वच्छ रस्ता – स्वच्छ परिसर” स्पर्धा, दर आठवड्याला विशेष स्वच्छता अभियान, शाळा-महाविद्यालयांमध्ये स्वच्छता दूत उपक्रम, तसेच अस्वच्छ ठिकाणांचे वॉल आर्टद्वारे सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. नागरिकांच्या तक्रारींच्या तातडीने निवारणासाठी डिजिटल प्रणाली विकसित करण्यावरही भर दिला जाणार आहे.
तसेच मोठ्या उत्सव व सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये “झिरो गार्बेज इव्हेंट” ही संकल्पना राबविणे, स्वयंसेवी संस्था, गृहनिर्माण संस्था आणि युवक संघटनांच्या माध्यमातून विविध स्वच्छता उपक्रम सुरू करणे, तसेच प्रत्येक स्वच्छता मोहिमेचे छायाचित्र आणि व्हिडिओ स्वरूपात दस्तऐवजीकरण करून सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
महापौर रवि लांडगे यांनी सांगितले की, “स्वच्छ आणि हरित पिंपरी-चिंचवड ही केवळ मोहीम नसून शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठीचे जनआंदोलन आहे. प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांच्या संयुक्त सहभागातून आपण स्वच्छ, हरित आणि आदर्श शहर घडवू शकतो.”
या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांनी स्वतंत्र कृती आराखडा तयार करून नियमित प्रगती अहवाल सादर करण्याच्या सूचनाही प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि पर्यावरण संवर्धनासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
प्रतिनिधी : शाम शिरसाठ पुणे






