अनधिकृत बांधकामांबाबत कोणतीही तडजोड नाही : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी.


अनधिकृत बांधकामांबाबत कोणतीही तडजोड नाही : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

PCMC ची कुदळवाडीत धडक कारवाई; ११ अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या ‘क’ व ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत चिखली, कुदळवाडी आणि पवारवस्ती परिसरातील अनधिकृत बांधकामांवर आज महापालिका प्रशासनाने मोठी धडक कारवाई केली. कडक पोलीस बंदोबस्तात राबविण्यात आलेल्या या मोहिमेत सुमारे २८ हजार १ चौ. फूट क्षेत्रफळाची ११ अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली.

ही कारवाई महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह आयुक्त, अपर पोलीस आयुक्त, पोलीस उपआयुक्त तसेच महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी सह शहर अभियंता, उपआयुक्त, सहाय्यक आयुक्त, क्षेत्रीय अधिकारी आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कारवाईसाठी महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागातील १२ कार्यकारी अभियंते, ३२ उपअभियंते, १८ कनिष्ठ अभियंते आणि ४२ स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बीट निरीक्षक) सहभागी झाले होते. तसेच वीज वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारीही या मोहिमेत सहभागी झाले.

कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जवळपास १५० एमएसएफ जवान, पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यासह २२ पोकलेन, २६ जेसीबी आणि १२० मजुरांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली. आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी घटनास्थळी ४ अग्निशमन वाहने आणि २ रुग्णवाहिकाही सज्ज ठेवण्यात आल्या होत्या.

याबाबत आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले, “शहरातील अनधिकृत बांधकामांवर कोणतीही तडजोड न करता कठोर कारवाई करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. नियोजित व शाश्वत शहरी विकासासाठी अनधिकृत बांधकामांचे निर्मूलन आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारच्या अनधिकृत बांधकामांना प्रशासनाकडून अभय दिले जाणार नाही. शहरातील पायाभूत सुविधा, सुरक्षितता आणि कायद्याचे पालन सुनिश्चित करण्यासाठी अशा कारवाया यापुढेही सातत्याने सुरू राहतील.”

तसेच नागरिकांनी कोणतेही बांधकाम करण्यापूर्वी आवश्यक परवानग्या घेऊनच पुढील कार्यवाही करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

प्रतिनिधी: शाम शिरसाठ पुणे.


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!