जामखेड तालुक्यातील मतेवाडीला मुसळधार पावसाचा तडाखा; शेतशिवारात पाणी, गल्लीबोळ जलमय:-


जामखेड तालुक्यातील मतेवाडीला मुसळधार पावसाचा तडाखा; शेतशिवारात पाणी, गल्लीबोळ जलमय:-

जि.अहिल्यानगर:ता.जामखेड:दि. 10 जून :-जामखेड तालुक्यातील मतेवाडी गाव आणि परिसरात सोमवारी दुपारपासून झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत केले. सुमारे दोन तास सतत कोसळलेल्या पावसामुळे गावातील रस्ते, गल्लीबोळ आणि शेतशिवार जलमय झाले असून अनेक ठिकाणी पाण्याचे लोट वाहताना दिसून आले.

दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास अचानक आकाशात काळे ढग दाटून आले. विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. सुरुवातीला रिमझिम असलेला पाऊस काही मिनिटांतच मुसळधार झाला आणि संपूर्ण परिसराला अक्षरशः झोडपून काढले.

अर्ध्या तासातच शेतशिवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. खरीप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी नांगरट केलेल्या शेतातून पाण्याचे प्रवाह वाहू लागले. काही ठिकाणी शेतबांध फुटल्याने सुपीक माती वाहून गेल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. गावातील अनेक अंतर्गत रस्ते आणि गल्लीबोळही पाण्याखाली गेले होते.

या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. एकीकडे जमीन चांगली भिजल्याने आगामी खरीप हंगामासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे, तर दुसरीकडे पेरणीपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना काही दिवस वाफसा होण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

एका शेतकऱ्याने सांगितले, “पेरणीपूर्वीच एवढा मोठा पाऊस झाला. जमीन पूर्णपणे भिजून निघाली आहे. आता चार-पाच दिवस वाफसा होण्याची वाट पाहावी लागेल. मात्र विहिरी आणि बोअरवेलच्या पाणीपातळीत वाढ होईल, ही समाधानाची बाब आहे.”

मुसळधार पावसामुळे परिसरातील वातावरणात गारवा निर्माण झाला असून शेतकरी आता पुढील पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

पत्रकार :विजय रणभोर, पुणे.
9359280220.


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!