भंडाऱ्यात शाळकरी मुलीचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; पाच जण पोलिसांच्या ताब्यात
भंडारा : भंडारा जिल्ह्यातील एका गावात शाळकरी अल्पवयीन मुलीचा आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी पोलिसांनी तातडीची कारवाई करत पाच जणांना ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा आक्षेपार्ह व्हिडिओ तयार करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर संबंधितांनी त्या व्हिडिओच्या आधारे मुलीवर दबाव टाकण्याचा तसेच तिला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
मात्र, मुलीने कोणत्याही दबावाला बळी न पडता धाडसाने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रार मिळताच पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून या प्रकरणातील पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये काही अल्पवयीन मुलांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
या घटनेचा पुढील तपास पोलीस करत असून संबंधितांवर विविध कलमांनुसार गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अल्पवयीन मुलीची ओळख गोपनीय ठेवण्यात आली असून नागरिकांनीही सोशल मीडियावर कोणतीही आक्षेपार्ह माहिती किंवा व्हिडिओ शेअर करू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून महिलांच्या व मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
– पत्रकार उमेश कुलकर्णी
मो. ९८२२५४८४२९







