पिंपरी-चिंचवड भाजपमध्ये जुन्या कार्यकर्त्यांची नाराजी; शहर कार्यकारिणीत संधी न मिळाल्याचा आरोप


पिंपरी-चिंचवड भाजपमध्ये जुन्या कार्यकर्त्यांची नाराजी; शहर कार्यकारिणीत संधी न मिळाल्याचा आरोप

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे ई-मेलद्वारे तक्रार; ‘निष्ठावंतांना न्याय द्या’ अशी सचिन काळभोर यांची मागणी
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर भारतीय जनता पक्षाच्या शहर कार्यकारिणीमध्ये जुन्या व निष्ठावंत कार्यकर्त्यांना स्थान दिले जात नसल्याचा आरोप करत भाजप कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे ई-मेलद्वारे तक्रार दाखल केली आहे. शहर कार्यकारिणीत दीर्घकाळ पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी देऊन त्यांना न्याय मिळावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

काळभोर यांनी केलेल्या आरोपानुसार, १३ मे २०२५ रोजी शत्रुघ्न काटे यांची पिंपरी-चिंचवड भाजप शहराध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर शहर कार्यकारिणीच्या रचनेत जुन्या कार्यकर्त्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात आले आहे. गेल्या एक वर्ष २९ दिवसांपासून अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांना शहर कार्यकारिणीत कोणतेही स्थान मिळाले नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.

त्यांच्या म्हणण्यानुसार, नागरी समस्या सोडवण्यासाठी मोर्चे, आंदोलने आणि विविध लोकहिताच्या प्रश्नांवर सातत्याने काम करणाऱ्या जुन्या कार्यकर्त्यांना डावलून नव्याने पक्षात प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांना तसेच काही माजी नगरसेवकांना महत्त्वाची पदे देण्यात आली आहेत.

सचिन काळभोर यांनी असा आरोपही केला आहे की, पक्षासाठी अनेक वर्षे कार्य करणाऱ्या आणि दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या विचारांशी निष्ठा राखणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी नाकारली जात आहे. त्याऐवजी काही नव्याने दाखल झालेल्या कार्यकर्त्यांना आणि आमदार समर्थकांना प्राधान्य दिले जात असल्यामुळे तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये नाराजी वाढत आहे.

तक्रारीत काही पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीबाबत आक्षेप नोंदवत, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींनाही शहर कार्यकारिणीत स्थान दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र या आरोपांबाबत संबंधितांकडून अधिकृत भूमिका समोर आलेली नाही.

काळभोर यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, भारतीय जनता पक्ष हा “सबका साथ, सबका विकास” या तत्त्वावर चालणारा पक्ष असून तो तळागाळातील कार्यकर्त्यांच्या बळावर उभा आहे. त्यामुळे पक्ष संघटना कोणत्याही व्यक्तीची खाजगी मालमत्ता नसून सर्व निष्ठावंत कार्यकर्त्यांना समान संधी मिळणे आवश्यक आहे.

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून पिंपरी-चिंचवड शहर भाजप कार्यकारिणीत जुन्या कार्यकर्त्यांना योग्य प्रतिनिधित्व मिळेल, यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी सचिन काळभोर यांनी केली आहे.

पत्रकार विजय अडसूळ


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!