पुणे महानगरपालिका आणि नागपूर RSS मुख्यालय बॉम्बने उडवण्याची धमकी; ई-मेल ठरला ‘फेक’, अफवेमुळे यंत्रणांची धावपळ
पुणे (दि. ११ जून):
पुण्यातील महापौर कार्यालय आणि नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) मुख्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी आल्याने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. ‘खलिस्तान नॅशनल आर्मी’च्या नावाने पाठवण्यात आलेल्या या ई-मेलमुळे सुरक्षा यंत्रणा कमालीच्या सतर्क झाल्या होत्या.
धमकीच्या ई-मेलची गंभीर दखल घेत आयुक्त नवल किशोर राम यांच्या सूचनेनुसार पुणे महानगरपालिकेची मुख्य इमारत तातडीने खाली करण्यात आली होती. पोलीस प्रशासन, श्वान पथक आणि बॉम्ब शोधक व नाशक पथकाने (BDDS) तातडीने संपूर्ण इमारतीचा कोपरा अन कोपरा कसून तपासला. सुरक्षेच्या कारणास्तव काही काळ मनपा इमारतीमध्ये कोणालाही प्रवेश दिला जात नव्हता.
सखोल तपासणीनंतर ई-मेल ठरला ‘फेक’
बॉम्ब शोधक पथकाने कित्येक तास केलेल्या सखोल तपासणीनंतर पुणे महानगरपालिका किंवा नागपूर येथील आरएसएस मुख्यालय, दोन्ही ठिकाणी कोणतीही संशयास्पद किंवा स्फोटक वस्तू आढळून आली नाही. यामुळे हा धमकीचा ई-मेल पूर्णपणे ‘फेक’ (Hoax Mail) असल्याचे आणि केवळ भीतीचे वातावरण निर्माण करण्यासाठी ही अफवा पसरवण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
हा फेक ई-मेल नेमका कुठून आणि कोणी पाठवला, याचा शोध आता पोलिसांचे सायबर सेल विभाग घेत आहे. ई-मेलचा आयपी (IP) अॅड्रेस ट्रेस केला जात असून, अफवा पसरवणाऱ्या समाजकंटकांचा शोध सुरू आहे.
पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429.










