संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ‘प्रकल्प वर्षा’ पुन्हा सुरू करण्याची मागणी:-


संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ‘प्रकल्प वर्षा’ पुन्हा सुरू करण्याची मागणी:-

महाराष्ट्र:दि. 12 जून :-जून महिन्याचा मध्य जवळ आला असतानाही राज्यातील अनेक भागांत समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत सन 2005 मध्ये बंद करण्यात आलेला ‘प्रकल्प वर्षा’ पुनरुज्जीवित करून क्लाऊड सीडिंग (Cloud Seeding) तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कृत्रिम पाऊस पाडण्याचा पर्याय शासनाने गांभीर्याने विचारात घ्यावा, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

कृत्रिम पाऊस म्हणजे वातावरणातील उपलब्ध पावसाळी ढगांमध्ये विशिष्ट रसायनांची फवारणी करून पाऊस पडण्यास पोषक परिस्थिती निर्माण करण्याची वैज्ञानिक प्रक्रिया होय. भारतातील काही राज्यांनी याचा यशस्वी वापर केला असून विशेषतः आंध्र प्रदेशमध्ये हायग्रोस्कोपिक क्लाऊड सीडिंग तंत्रज्ञानाद्वारे सकारात्मक परिणाम मिळाल्याचे उदाहरण देण्यात आले आहे.

निवेदनात नमूद केल्यानुसार, कृत्रिम पाऊस प्रकल्पासाठी काही कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असला तरी दुष्काळी परिस्थितीत शासनाला पिण्याच्या पाण्यासाठी टँकर, जनावरांसाठी चारा छावण्या, रोजगार हमी योजनांची कामे, जलटंचाई निवारण उपाययोजना आणि इतर प्रशासकीय बाबींवर शेकडो कोटी रुपयांचा खर्च करावा लागतो. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कृत्रिम पाऊस प्रकल्प अधिक परिणामकारक आणि किफायतशीर ठरू शकतो.

याशिवाय पाणीटंचाई, जनावरांच्या चाऱ्याची समस्या, रोजगार हमी योजनांवरील ताण तसेच दुष्काळी परिस्थितीत उद्भवणाऱ्या विविध अडचणी कमी करण्यासाठीही हा प्रकल्प उपयुक्त ठरेल, असे मत व्यक्त करण्यात आले आहे.

महाराष्ट्र शासनाने तातडीने ‘प्रकल्प वर्षा’ पुनरुज्जीवित करून आवश्यक रडार प्रणाली, विमाने, हवामान निरीक्षण यंत्रणा आणि क्लाऊड सीडिंगसाठी लागणारी संपूर्ण सुविधा उभारून कृत्रिम पावसाचा कार्यक्रम राबवावा, अशी मागणी भारतीय जनसंसदचे राज्य निमंत्रक अशोक सब्बन, सरपंच कैलास पठारे, युवानेते अशोक ढगे, वीर बहादूर प्रजापती, सुनील टाक, परदेशी, भगवान जगताप, भोसले, पोपटराव साठे आणि जिल्हाध्यक्ष सुधीर भद्रे यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

पत्रकार :-विजय रणभोर, पुणे.
9359280220.


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!