एसटी प्रवासासाठी १ ऑगस्टपासून NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची


एसटी प्रवासासाठी १ ऑगस्टपासून NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

मुंबई :महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी येत्या १ ऑगस्ट २०२६ पासून NCMC (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली.
राज्यात आतापर्यंत सुमारे ५१ लाख नागरिकांनी NCMC स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली असून त्यापैकी जवळपास २५ लाख कार्डे कार्यान्वित झाल्याचे सांगण्यात आले आहे. एसटी प्रवासातील सवलतींचा लाभ घेण्यासाठी पात्र प्रवाशांनी वेळेत स्मार्ट कार्ड काढून घ्यावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देणे, प्रवाशांना अधिक सुलभ सेवा उपलब्ध करून देणे आणि सवलतींचे व्यवस्थापन अधिक पारदर्शक बनविणे हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश असल्याचे परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, स्मार्ट कार्ड वितरणासाठी नियुक्त करण्यात आलेल्या केंद्रांकडून अतिरिक्त शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारी समोर आल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे.
एसटी महामंडळाच्या या निर्णयामुळे राज्यातील लाखो महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांना प्रवासासाठी NCMC स्मार्ट कार्ड घेणे आवश्यक ठरणार आहे.

पत्रकार उमेश कुलकर्णी 9822548429


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!