इचलकरंजीसाठी नियोजित राधाकृष्ण पाणी योजनेस दानवाड पंचक्रोशीतून तीव्र विरोध; जल आक्रोश समितीची स्थापना:-


इचलकरंजीसाठी नियोजित राधाकृष्ण पाणी योजनेस दानवाड पंचक्रोशीतून तीव्र विरोध; जल आक्रोश समितीची स्थापना:-


जि. कोल्हापूर:ता.इचलकरंजी:दि. 13 जून :-इचलकरंजी शहरासाठी प्रस्तावित राधाकृष्ण पाणीपुरवठा योजनेविरोधात दानवाड पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त करत शनिवारी (दि. १३) दानवाड येथील मारुती मंदिरात जाहीर बैठकीचे आयोजन केले. या बैठकीत दानवाड, टाकळी, टाकळीवाडी, खिद्रापूर, राजापूर, राजापूरवाडी आदी गावांतील लोकप्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शासनाने इचलकरंजी शहरासाठी दानवाड येथील राधाकृष्ण संगमावरून पाणीपुरवठा योजना राबविण्याची घोषणा केली आहे. या योजनेमुळे कृष्णा आणि दुधगंगा नदीकाठच्या गावांवर गंभीर परिणाम होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली. बैठकीत उपस्थितांनी सांगितले की, राजापूर बंधाऱ्याखालील तसेच दुधगंगा नदीकाठच्या अनेक गावांना दरवर्षी तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. या भागातील शेती आणि पिण्याच्या पाण्याचा पुरवठा पूर्णपणे कृष्णा व दुधगंगा नदीवर अवलंबून आहे.

या परिस्थितीत राधाकृष्ण संगमावरून मोठ्या प्रमाणात पाणी उचलल्यास परिसरातील दहा ते बारा गावांमध्ये भविष्यात गंभीर पाणीटंचाई निर्माण होऊ शकते. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत ही योजना रद्द करण्यात यावी, असा ठाम निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला.

यावेळी ‘राधाकृष्ण संगमभूमी जल आक्रोश समिती’ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करून त्याच ठिकाणाहून इचलकरंजी शहरासाठी वाढीव पाणीपुरवठा करण्याचा पर्याय शासनाने स्वीकारावा, असा ठरावही बैठकीत मंजूर करण्यात आला.

ग्रामसभांमधून ठराव मंजूर करून त्याच्या प्रती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि पाटबंधारे विभागाकडे निवेदनाद्वारे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच शासनाने स्थानिक जनतेचा विरोध डावलून ही योजना राबविण्याचा प्रयत्न केल्यास व्यापक जनआंदोलन उभारण्याचा इशाराही देण्यात आला.

बैठकीत लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवरही चर्चा झाली. स्थानिक भागाच्या पाणीहक्कासाठी लोकप्रतिनिधींनी स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी उपस्थितांनी केली. योजनेविरोधातील लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त करत बैठकीची सांगता करण्यात आली.

पत्रकार : विजय रणभोर, पुणे.
9359280220.


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!