भोसरी प्रभाग ५ मध्ये कचऱ्याचे साम्राज्य; गणेशोत्सवात दुर्गंधीने नागरिक त्रस्त


भोसरी प्रभाग ५ मध्ये कचऱ्याचे साम्राज्य; गणेशोत्सवात दुर्गंधीने नागरिक त्रस्त

चार दिवसांपासून घंटागाडी गायब; नागरिकांचा संतप्त सवाल – स्वच्छ परिसर संकल्पना केवळ कागदावरच?
भोसरी : भोसरी प्रभाग क्रमांक ५ मधील आळंदी रोड, हुतात्मा चौक ते जय महाराष्ट्र चौक परिसरातील हनुमान कॉलनी आणि गुळवे मैदान परिसरात गेल्या चार दिवसांपासून कचरा संकलन करणारी घंटागाडी न आल्याने कचऱ्याचे ढीग साचले आहेत. गणेशोत्सवाच्या काळातच परिसरात निर्माण झालेल्या या कचऱ्यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत असून, पालिका प्रशासनाच्या स्वच्छता व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
हनुमान कॉलनी परिसरातील रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात कचरा साचला असून, या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांवर कुत्री आणि गुरांचा वावर वाढला आहे. त्यामुळे कचरा रस्त्यावर पसरत असून नागरिकांना या परिसरातून चालणेही कठीण झाले आहे. कचऱ्यामुळे परिसरात अस्वच्छतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
कचऱ्यामुळे निर्माण होणारी दुर्गंधी इतकी तीव्र आहे की, अनेक रहिवाशांना घराची दारे-खिडक्या बंद करून राहावे लागत आहे. अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला असून, आजारपण वाढत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
एकीकडे महापालिका प्रशासनाकडून ‘स्वच्छ परिसर, सुंदर परिसर’ यासाठी विविध उपक्रम राबविले जात असल्याचे सांगितले जाते. मात्र, प्रत्यक्षात प्रभाग क्रमांक ५ मधील हनुमान कॉलनी परिसरात चार दिवसांपासून कचरा उचलला जात नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
गणेशोत्सवासारख्या सणाच्या काळात तरी परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी पालिका प्रशासनाने तातडीने कचरा संकलनाची व्यवस्था करावी, साचलेला कचरा हटवावा आणि नियमित घंटागाडी सुरू करावी, अशी मागणी योगेश ठाकरे उ बा ठा गट विभाग प्रमुख,तसेच स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
पालिका प्रशासन आणि संबंधित स्वच्छता कर्मचाऱ्यांनी ‘स्वच्छ परिसर’ या संकल्पनेलाच केराची टोपली दाखवली आहे का?, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.


52
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!