वेदांत बंडगर ची हत्या करणारा मुख्य संशयित पोलिसांच्या जाळ्यात :-
सांगली:दि. 14 जून :-शहरातील वेदांत बंडगर हत्याप्रकरणाच्या तपासात सांगली पोलिसांना महत्त्वाचे यश मिळाले आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित मानल्या जाणाऱ्या नीलेश गडदे याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (एलसीबी) पथकाने ताब्यात घेतले असून, त्याला अटक करण्यात आली आहे.
यापूर्वी या गुन्ह्यातील एका संशयिताला अटक करण्यात आली होती. त्यामुळे आतापर्यंत दोन जण पोलिसांच्या जाळ्यात अडकले असून, आणखी तीन संशयितांचा शोध सुरू आहे. फरार आरोपींच्या मागावर पोलिसांची विशेष पथके कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे.
मुख्य संशयित नीलेश गडदे अटकेत आल्यामुळे तपासाला वेग मिळण्याची शक्यता आहे. या हत्येमागील नेमके कारण काय होते, कटात आणखी कोणाचा सहभाग होता का, तसेच गुन्ह्याची संपूर्ण पार्श्वभूमी काय होती, याबाबत महत्त्वाची माहिती समोर येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
शहरात खळबळ उडवून देणाऱ्या या हत्याकांडाचा उलगडा करण्यासाठी पोलिसांकडून कसून चौकशी सुरू असून, पुढील तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पत्रकार :विजय रणभोर, पुणे.










