कोल्हापुरात बाहेरील वाहनांवर ‘प्रवेश कर’ लावण्याचा प्रस्ताव; विविध संघटनांचा तीव्र विरोध
कोल्हापूर : कोल्हापूर शहरात येणाऱ्या बाहेरील वाहनांवर (MH-09 वगळून) प्रवेश कर (एंट्री टॅक्स) आकारण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या १७ जून रोजी होणाऱ्या महासभेसमोर ठेवण्यात येणार आहे. शहरातील वाढती वाहतूक आणि रस्त्यांवरील ताण कमी करण्यासाठी हा निर्णय सुचविण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
मात्र, या प्रस्तावामुळे कोल्हापूर शहरात येणाऱ्या परजिल्ह्यातील नागरिक, व्यापारी, शेतकरी आणि प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक भार पडणार असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह विविध सामाजिक आणि स्थानिक संघटनांनी या प्रस्तावाला तीव्र विरोध दर्शविला आहे.
विरोधकांच्या मते, कोल्हापूर हे व्यापार, शिक्षण, आरोग्य आणि धार्मिक पर्यटनाचे प्रमुख केंद्र असून दररोज हजारो नागरिक विविध कामांसाठी शहरात येत असतात. अशा परिस्थितीत प्रवेश कर आकारल्यास सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक फटका बसू शकतो. तसेच या निर्णयाचा स्थानिक व्यापार आणि पर्यटनावरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, १७ जून रोजी होणाऱ्या महासभेत या प्रस्तावावर चर्चा होणार असून महासभेची मंजुरी मिळाल्यास प्रवेश कर लागू करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे या प्रस्तावाकडे कोल्हापूरसह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429









