पुण्यात नवीन गाडी घेतल्याच्या आनंदात वाटलेल्या पेढ्यातून ७ जणांना विषबाधा; मिठाई दुकान सील
पुणे : नवीन दुचाकी खरेदी केल्याचा आनंद साजरा करताना वाटण्यात आलेले पेढे खाल्ल्याने पुण्यातील वडगाव शेरी परिसरात २ लहान मुलांसह ७ जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेतील एका व्यक्तीची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, नवीन वाहन खरेदी केल्यानंतर परिसरातील नातेवाईक आणि मित्रांना पेढे वाटण्यात आले होते. पेढे खाल्ल्यानंतर काही वेळातच अनेकांना मळमळ, उलट्या आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाला. त्यानंतर सर्वांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
घटनेची तक्रार अन्न व औषध प्रशासनाकडे (FDA) करण्यात आल्यानंतर आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशाने अधिकाऱ्यांनी संबंधित मिठाई दुकानावर तातडीने छापा टाकला. यावेळी संशयित पेढ्यांचे नमुने तपासणीसाठी जप्त करण्यात आले असून पुढील आदेशापर्यंत संबंधित दुकान सील करण्यात आले आहे.
अन्न व औषध प्रशासनाने नमुन्यांची प्रयोगशाळेत तपासणी सुरू केली असून अहवाल आल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये मिठाईच्या गुणवत्तेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
– पत्रकार उमेश कुलकर्णी









