ग्रामीण रुग्णालयासाठी जागा दिली, पण २० वर्षांपासून न्यायाची प्रतीक्षा!
बदलापूरमधील धक्कादायक प्रकार
बदलापूर: ग्रामीण रुग्णालयाच्या उभारणीसाठी स्वतःची हक्काची जागा देऊनही गेल्या २० वर्षांपासून एका कुटुंबाला न्यायासाठी वणवण करावी लागत असल्याचा धक्कादायक प्रकार बदलापूरमध्ये समोर आला आहे. ‘आपले बदलापूर’ या सोशल मीडिया पेजवरून या अन्यायाला वाचा फोडण्यात आली असून, पीडित कुटुंबाची व्यथा मांडणारा एक व्हिडिओ सध्या वेगाने व्हायरल होत आहे.
सार्वजनिक हिताचा आणि आरोग्याचा विचार करून या नागरिकांनी प्रशासनाला रुग्णालयासाठी जागा उपलब्ध करून दिली होती. मात्र, दोन दशके उलटूनही प्रशासनाकडून योग्य तो मोबदला किंवा न्याय मिळालेला नाही. २० वर्षांचा प्रदीर्घ काळ उलटूनही पदरी केवळ उपेक्षाच आल्याने स्थानिक नागरिकांमध्ये प्रशासकीय कारभाराबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
हा गंभीर विषय आता थेट राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे आवाहन सोशल मीडियाच्या माध्यमातून केले जात आहे. जनहितासाठी त्याग करणाऱ्या सामान्य नागरिकांवर अशी वेळ का आली, असा सवाल उपस्थित होत असून शासन या प्रकरणाची दखल घेऊन संबंधित कुटुंबाला न्याय देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429







