पारधमध्ये हिडिंबा माता व महर्षी पराशर महाराजांच्या यात्रेला आज पासून उत्साहात सुरुवात


पारधमध्ये हिडिंबा माता व महर्षी पराशर महाराजांच्या यात्रेला आज पासून उत्साहात सुरुवात

श्री पराशर महाराज संस्थान व ग्रामपंचायतीकडून भाविकांसाठी विशेष सुविधा; पोलीस प्रशासनाचा कडेकोट बंदोबस्त

पारध | प्रतिनिधी /महेंद्र बेराड

भोकरदन तालुक्यातील ऐतिहासिक पारध (शाहूराजे) येथे भाद्रपद शुद्ध द्वितीयेनिमित्त हिडिंबा माता व महर्षी पराशर महाराज यांच्या वार्षिक यात्रेला उत्साहात सुरुवात झाली आहे. १२ ते १४ सप्टेंबरदरम्यान होणाऱ्या या तीनदिवसीय यात्रेसाठी मराठवाडा, खान्देश आणि विदर्भासह विविध भागांतून हजारो भाविक पारधनगरीत दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.

महाभारतातील कथेनुसार भीमाची पत्नी व घटोत्कचाची आई असलेल्या हिडिंबा मातेला पारध परिसरात ग्रामदैवताचा मान आहे. यात्रेनिमित्त बांबू व पाचटापासून सुमारे १५ ते २० फूट उंचीची हिडिंबा मातेची आकर्षक प्रतिमा तयार केली जाते. ढोल-ताशांच्या गजरात या प्रतिमेची मिरवणूक काढून विधिवत पूजा केली जाते. नोकरी निमित्त बाहेरगावी राहणारे गावातील नागरिक यात्रेसाठी आवर्जून गावात येतात. तसेच गावातील मुली बाळी सुद्धा यात्रेनिमित्त आपल्या माहेरी आवर्जून येतात.

सूर्यवंशी बारी समाजाकडून हिडिंबा मातेची प्रतिमा

पारध येथील स्थानिक श्री सूर्यवंशी बारी समाजाच्या वतीने हिडिंबा मातेची प्रतिमा तयार केली जाते. अनेक वर्षांपासून समाजाच्या सहभागातून ही धार्मिक व सांस्कृतिक परंपरा जपली जात आहे. त्याचप्रमाणे गावातील माळी समाजाच्या वतीने वगदा-वगदीची प्रतिमा तयार करून मिरवणूक काढण्यात येते. या उपक्रमासाठी सुतार समाजाकडूनही मोलाचे सहकार्य केले जाते. विविध समाजांच्या एकत्रित सहभागातून यात्रेतील सामाजिक एकोपा आणि पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडते.

भाविकांसाठी विशेष सुविधा

यात्रेच्या पार्श्वभूमीवर श्री पराशर महाराज संस्थान व ग्रामपंचायत पारध यांच्या वतीने भाविकांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी यात्रेची तयारी पूर्ण करण्यात आली असून, स्वच्छता, पाणी, वाहतूक व इतर आवश्यक बाबींची व्यवस्था करण्यात येत आहे.

यात्रेनिमित्त पारधच्या श्री पराशर महाराज संस्थान परिसरात राहाट पाळणे, मिक्सर, खेळण्याची, मिठाई, भांडे, प्रसाद तसेच विविध वस्तूंची दुकाने थाटण्यात आली असून, दुकानदारांनी आपापली दुकाने सजविली आहेत. त्यामुळे यात्रास्थळी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलीस प्रशासनाकडून विशेष बंदोबस्त

यात्रेदरम्यान भाविकांची मोठी गर्दी होणार असल्याने पोलीस स्टेशन पारधच्या वतीने विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. वाहतूक व्यवस्था, गर्दीचे नियोजन तसेच भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत.

यात्रेनिमित्त गावातील तरुणांकडून लाठी-काठी, मुद्गल, लेझीम तसेच विविध पारंपरिक खेळांचे सादरीकरण करण्यात येते. धार्मिक कार्यक्रम, भजन, भारूड, मर्दानी खेळ आणि कुस्तीच्या आखाड्यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

हिडिंबा यात्रा ही पारधच्या धार्मिक व सांस्कृतिक वैभवाची ओळख – महेंद्र बेराड

याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना महेंद्र बेराड, पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते म्हणाले, “हिडिंबा माता आणि महर्षी पराशर महाराजांची यात्रा ही पारधच्या धार्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभवाची ओळख आहे. अनेक वर्षांपासून विविध समाजांच्या सहभागातून ही परंपरा जपली जात आहे. सूर्यवंशी बारी समाजाकडून हिडिंबा मातेची प्रतिमा, माळी समाजाकडून वगदा-वगदीची प्रतिमा आणि सुतार समाजाकडून मिळणारे सहकार्य हे सामाजिक एकतेचे उत्तम उदाहरण आहे.”

ते पुढे म्हणाले, “यात्रेसाठी श्री पराशर महाराज संस्थान, ग्रामपंचायत पारध, पोलीस प्रशासन तसेच ग्रामस्थांकडून करण्यात आलेली तयारी कौतुकास्पद आहे. बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात आणि यात्रा शांततेत व उत्साहात पार पडावी, यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. पारधची ही ऐतिहासिक धार्मिक परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत जपणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.”

यात्रेनिमित्त संपूर्ण पारधनगरी सजली असून, भाविक, ग्रामस्थ, दुकानदार, तरुण मंडळी आणि विविध समाजबांधवांच्या सहभागामुळे पारधमध्ये भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.


51
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!